
खेडच्या अमल सिद्दीकीची रत्नागिरी जिल्हा १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड;
खेड तालुक्यातील उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू अमल सलीम सिद्दीकी हिने अल्पवयात मोठी झेप घेत रत्नागिरी जिल्हा १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघाच्या कर्णधार पदावर आपले नाव कोरले आहे. तिच्या या निवडीमुळे खेड तालुक्याच्या क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खेड क्रिकेट अकॅडमी मध्ये नियमित सराव करणारी अमल सिद्दीकी ही मेहनती, शिस्तप्रिय आणि जिद्दी खेळाडू म्हणून ओळखली जाते. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नेतृत्व या तिन्ही बाबींमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.संघातील खेळाडूंना एकत्र ठेवण्याची क्षमता आणि दबावाच्या परिस्थितीत शांतपणे निर्णय घेण्याची तिची शैली ही तिच्या नेतृत्व गुणांची मोठी जमेची बाजू मानली जात आहे.
अमल सध्या खेड येथील एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत आहे. शैक्षणिक प्रगती सोबतच क्रीडा क्षेत्रातही ती सातत्याने उल्लेखनीय यश मिळवत आहे.
अमल सिद्दीकीचे वडील सलीम इसहाक सिद्दीकी यांनी मुलीच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे अमल सिद्दीकीने लहान वयातच क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील मुलींनी खेळाकडे वळावे आणि मोठी स्वप्ने पाहावीत, यासाठी अमल सिद्दीकीचे यश प्रेरणादायी ठरत आहे.
खेड क्रिकेट अकॅडमी मधून यापूर्वीही अनेक खेळाडूंनी जिल्हा व विभागीय स्तरावर यश मिळवले आहे.




