
‘महावॉकेथॉन’ आणि ‘मृद व जलसंवर्धन रील’ स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन
रत्नागिरी, दि. १७ ) – मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत राज्यभर ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे. राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी करणारे माजी मुख्यमंत्री श्री. सुधाकररावजी नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जन्मदिवस संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी ‘महावॉकेथॉन’ (Walk for Water) आणि तरुणांसाठी विशेष ‘मृद व जलसंवर्धन रील’ (Reel) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही उपक्रमांत जिल्ह्यातील नागरिकांनी व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
महावॉकेथॉन (Walk for Water) – २१ ऑगस्ट
पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी विशेष ‘महावॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे.
अंतर: कमाल ३ किलोमीटर
वयोगट: १५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते.
नोंदणी: क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून नोंदणी करणे आवश्यक.
बक्षिसे: वॉकेथॉनमधील प्रथम ५ विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल, तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ई-प्रमाणपत्र दिले जाईल.
आवाहन: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना आणि जास्तीत जास्त नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
मृद व जलसंवर्धन रील स्पर्धा (Reel for Soil and Water Conservation)
जलसाक्षरतेचा संदेश तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत रोख रकमेची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
स्पर्धेची थीम: Save Soil, Save Water, Secure Tomorrow
वयोगट: १५ ते ३० वर्षे
बक्षिसांचे स्वरूप:
प्रथम पुरस्कार: २५,००० रुपये
द्वितीय पुरस्कार: १५,००० रुपये
तृतीय पुरस्कार: १०,००० रुपये
(याव्यतिरिक्त विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आणि उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.)
रील स्पर्धेचे नियम आणि अटी:
वेळमर्यादा: इंस्टाग्राम रील ३० ते ६० सेकंदांची असावी.
सुरुवात: व्हिडिओच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्पर्धकाचे स्वतःचे संपूर्ण नाव व जिल्ह्याचे नाव स्पष्टपणे नमूद केलेले असावे.
पोस्टिंग: रील स्वतःच्या पब्लिक इंस्टाग्राम (Public Instagram) अकाऊंटवरूनच पोस्ट करावी.
टॅगिंग व हॅशटॅग: रील पोस्ट करताना मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करणे अनिवार्य आहे. तसेच कॅप्शनमध्ये #SaveSoilSaveWater या अधिकृत हॅशटॅगचा वापर करणे बंधनकारक आहे.
नोंदणी: या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून अधिकृत नोंदणी करणे आवश्यक राहील.




