
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रो गोविंदा दहीहंडीचा शुभारंभ; नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूणमध्ये जल्लोष
श्री गणेश गोविंदापथक गोवळकोट विजेते; विविध सामाजिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष आणि शिवसेना शहरप्रमुख उमेश धोंडीराम सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य प्रो गोविंदा दहीहंडी स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. छत्रपती पुरस्कारप्राप्त शांताराम जोशी व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह आणि नागरिकांच्या जल्लोषामुळे परिसर दुमदुमून गेला.
या स्पर्धेत श्री गणेश गोवळकोट दहीहंडी पथकाने विजेतेपद पटकावले. विविध गोविंदा पथकांनी शिस्त, संघभावना आणि कौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून करण्यात आली. त्यानंतर श्री जुना काळभैरव मंदिरात दर्शन घेण्यात आले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. गोवळकोट येथे मेमन समाजाच्या वतीने नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार करण्यात आला. पदाधिकारी दयानंद जुवळे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
पेठमाप येथे नगरसेवक प्रमोद बुरटे व विकी लवेकर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी किटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चिपळूणमध्ये प्रथमच आयोजित या स्पर्धेला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक, धार्मिक व क्रीडा उपक्रमांचे कौतुक केले. गेल्या आठ महिन्यांतील त्यांच्या कामाचा उल्लेख करत योग्य व्यक्तीची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांना मिळालेली गर्दी ही नागरिकांचा उमेश सकपाळ यांच्यावरील विश्वास दर्शवित असल्याचेही सामंत यांनी नमूद केले.
शहरातील विविध देवस्थानांचे विश्वस्त तसेच मस्जिदीतील इमाम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. धार्मिक व सामाजिक सलोखा, एकोपा आणि सर्वधर्मसमभावाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्याला मोठी उपस्थिती लाभली.
दरम्यान, नगराध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांवर आधारित जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन बांधकाम सभापती कपिल शिर्के व शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले. तरुणाईने विविध कार्यक्रमांचे क्षण रीलच्या माध्यमातून टिपत या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमांना माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मयुरीताई शिर्के, जिल्हा परिषद सदस्य बापू म्हाप, उपनगराध्यक्षा रूपालीताई दांडेकर, बाळशेठ जाधव, तालुकाप्रमुख रुपेश घाग, दिलीपराव चव्हाण, प्रांताधिकारी आकाश लिंगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलीस अधिकारी मेंगडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
सामाजिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांनी सजलेल्या या वाढदिवस सोहळ्यामुळे चिपळूण शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शिवसेना शहर चिपळूण व श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांची सांगता जल्लोषात झाली.




