रत्नागिरीत बँक खात्यातून पावणेसहा लाख रुपये लांबवले

रत्नागिरी : शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरातील शाखेतून अज्ञात इसमाने ऑनलाईन पद्धतीने तब्बल ५ लाख ८६ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धीरज अर्जुन भानुशाली (रा. शांतिनगर, रत्नागिरी)यांचे या बँकेत बचत खाते आहे. २५ जुलै रोजी संध्याकाळी ६:३६ ते ७:३७ या अवघ्या एका तासाच्या कालावधीत अज्ञात भामट्याने या खात्यातून सायबर सेंध लावत ५ लाख ८६ हजार ९ रुपये परस्पर वळवून घेतले.
आपल्या मित्राची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, कर सल्लागार राजेश रमेश सोहनी यांनी ३१ जुलै रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८ (४) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम २००० चे कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँक खाते, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये आणि अशी फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button