
खेडमधील डुबी नदीवर उभारला जाणार पिंपळवाडी जलविद्युत प्रकल्प
महाराष्ट्रातील जलसंपदा क्षेत्रात खाजगी गुतवणुकीला चालना देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पडले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खाजगी भागीदारीतून नव्या जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आणि अग्रगण्य व्यावसायिक संस्था असलेल्या गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात मुंबईत एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत.
या संयुक्त करारानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या डुबी नदीवर पिंपळवाडी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प १ गुणिले ०.४०० मेगावॅट (१०.४००) क्षमतेचा असून तो बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच उभारा, चालवा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवला जाणार आहे. सुरुवातीला या कराराची मुदत ३० वर्षांची असेल, ज्यामध्ये गद्रे मरीन कंपनी स्वनिधीतून या प्रकल्पाची संपूर्ण उभारणी, देखभाल आणि संचालन करेल. या प्रकल्पामुळे कोकण परिसरातील स्थानिक वीज निर्मितीला गती मिळणार असून, खाजगी क्षेत्रातील कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर धोरणांतर्गत या विजेचा वापर केला जाईल. शासनाच्या २००५ मधील ऐतिहासिक जलविद्युत धोरणाचा आधार घेत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.



