
जंतर-मंतरवर पुन्हा संघर्ष; देशभरातून नवे आंदोलक दिल्लीमध्ये दाखल!
नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनासाठी बुधवारी गर्दी आणखी वाढली. ‘चलो संसद’ मोर्चानंतर दोन दिवसांनी निदर्शनांना प्रतिसाद वाढत असल्याचे दिसत आहे. नव्याने आलेले आंदोलकही विविध घोषणा देत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला आहे.
अनेक नवे आंदोलक देशाच्या विविध भागांतून बस आणि रेल्वेने रात्रभर प्रवास करून आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. पाठीवर बॅगपॅक घेऊन आणि हातात गुंडाळलेले फलक घेऊन हे निदर्शक विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जमा होत आहेत. स्वयंसेवकांनी या आंदोलकांना जंतर-मंतरची दिशा दाखवली आणि त्यांना पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थांचे वाटप केले. नव्या आंदोलकांमध्ये शाळेच्या गणवेशातील मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, मध्यमवयीन आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील आणि वेगवेगळ्या सामाजिक थरांतील लोकांचा समावेश आहे.
जंतर-मंतरवरील वातावरणात बुधवारी दुपारपासूनच उत्साह वाढायला लागल्याचे चित्र आहे. काही जण रस्त्याच्या कडेला बसून व्यासपीठावरून होणारी भाषणे ऐकत आहेत, काही घोषणा देत आणि हातातील फलक उंचावत पोलीस बॅरिकेडजवळ जमा होत आहेत. गर्दी वाढत असताना काही निदर्शक झाडांवर चढून व्यासपीठाचे दृश्य पाहण्याचा प्रयत्न करत आहेत.
समाजकंटकांकडून दगडफेक
निदर्शनांदरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांसह एकूण सहा जण जखमी झाले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दगडफेकीची ही घटना जंतर-मंतर येथे बुधवारी संध्याकाळी घडली, असे सूत्रांनी सांगितले. निदर्शनाच्या ठिकाणी अनेक समाजकंटकांनी घुसखोरी केली आहे, असा दावाही त्यांनी केला. ”ते आयोजकांचेही (सीजेपी) ऐकत नाहीत आणि पोलिसांवर दगडफेक करत आहेत,” असे सूत्रांचे म्हणणे आहे. जखमी पोलिसांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली.
निदर्शकाच्या प्रकृतीत सुधारणा
नवी दिल्ली : सोमवारी निदर्शनांदरम्यान जखमी झालेल्या साक्षी या २३ वर्षीय आंदोलकाची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. तिच्यावर राममनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असून तिची जीवरक्षक प्रणाली हटवण्यात आली आहे. तिला आता स्वत:हून श्वास घेता येत आहे आणि ती उपचारांना प्रतिसाद देत आहे, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
‘आप’ची दिल्ली पोलिसांवर कारवाईची मागणी
नवी दिल्ली : निदर्शकांवर अमानुष लाठीमार करणार्या आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणार्या पोलिसांवर कारवाई केली जावी, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) केली. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराच्या अनेक ध्वनिचित्रफीती उपलब्ध असतानाही केंद्र सरकार त्यासंबंधी कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी टीका ‘आप’ने केली. महिला निदर्शकांशी लैंगिक गैरवर्तन केलेल्या पोलीस अधिकार्याची ओळख पटलेली असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप ‘आप’चे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी केला.




