
मुंबईकरांच्या उरात धडकी भरवणारा UN चा रिपोर्ट, सुमद्राची वाढती जलपातळी मुंबई-कोलकात्यातील लाखो लोकांसाठी धोक्याची घंटी!
संयुक्त राष्ट्र : समुद्राची पातळी वाढत असल्यामुळे कोलकाता आणि मुंबईतील कोट्यवधी लोकांवर धोका निर्माण झाला आहे. या धोक्याबद्दल इशारा देताना संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे की, समुद्राची वेगाने वाढणारी पातळी जगभरातील लोकसंख्येसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक बनली आहे.
ग्लेशियर्स (बर्फ) वितळल्यामुळे आणि समुद्र गरम झाल्यामुळे समुद्राची पातळी अभूतपूर्व वेगाने वाढत आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र प्रमुखांच्या ‘समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या अहवालात म्हटले आहे की, समुद्राची पातळी वाढल्यामुळे शहरी पायाभूत सुविधा, वाहतूक जाळे, ऊर्जा ग्रिड, इमारती आणि भूजल संसाधनांचे आधीच नुकसान होत आहे. याचे दूरगामी परिणाम होत आहेत. यामुळे दीर्घकालीन विकास आणि आर्थिक स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. या धोक्यांचे स्वरूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे असू शकते.
दक्षिण आशियातील सखल डेल्टा भागात आणि भारतातील कोलकाता व मुंबई तसेच ढाका यांसारख्या शहरांमध्ये लोकांचे विस्थापन हा सर्वात मोठा परिणाम आहे. 1.4 कोटींपेक्षा जास्त लोकांची घरे कायमस्वरूपी पाण्यात बुडण्याचा तात्काळ धोका आहे.
अमेरिकेतील मियामी आणि न्यूयॉर्क तसेच चीनमधील ग्वांगझू यांसारख्या उच्च उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये, याचा मुख्य परिणाम किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांवर होणाऱ्या मोठ्या आर्थिक धोक्याच्या रूपाने होणार आहे. यामध्ये 2 हजार अब्ज ते 3.5 हजार अब्ज अमेरिकन डॉलर मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे. यामध्ये असेही म्हटले आहे की, धोक्याचे मूल्यांकन करण्याचे निकष मजबूत आणि व्यापक करण्याची गरज आहे, जेणेकरून सामाजिक धोक्यांनाही आर्थिक धोक्यांइतकेच प्राधान्य मिळेल.
समुद्राची पातळी वाढल्याने सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होतो. किनारपट्टीच्या भागातील आरोग्य आणि स्वच्छता पायाभूत सुविधांचे नुकसान होते, पाण्यातून होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. मृत्यूचा धोका आणि मानसिक ताणही वाढतो.
अहवालानुसार, समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि भूस्खलन यांच्या एकत्रित परिणामांमुळे पुराचा धोका वाढत आहे आणि जीवितहानी, वित्तहानी, उपजीविका आणि आवश्यक जल परिसंस्था व अधिवासांचे नुकसानही वाढत आहे. समुद्राच्या पातळीत वेगाने होणारी वाढ ही प्रामुख्याने ग्लेशियर्स वितळण्यामुळे आणि मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे गरम होत असलेल्या महासागरांचा परिणाम आहे. 2014 आणि 2023 दरम्यान, जगभरात समुद्राची पातळी दरवर्षी 4.7 मिमीने वाढली. 2024 मध्ये, समुद्राची पातळी 5.9 मिमीने वाढली, जो एक नवीन विक्रम आहे. याचे मुख्य कारण म्हणजे समुद्र अत्यंत गरम होणे आहे – काही भागांत तर हे गेल्या चार हजार वर्षांत सर्वात वेगाने गरम झाले आहे. 2050 पर्यंत हा वेग आणखी वाढण्याची भीती आहे.
अहवालानुसार, सुमारे 77 कोटी लोक-म्हणजेच जगातील लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के भाग-किनारपट्टीच्या भागात राहतात. त्यांच्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे. या भागांमध्ये, समुद्राची पातळी वाढल्याने किनारी भागात येणारा पूर, गोड्या पाण्याचे खारे होणे, जमिनीची धूप आणि परिसंस्थेचे नुकसान यासह हवामानाशी संबंधित सध्याच्या समस्या आणखी गंभीर होत आहेत. या सर्वांचा सुरक्षा, उपजीविका, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यावरणावर खोल परिणाम होत आहे. पायाभूत सुविधा, शेती, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक वारशावर सातत्याने धोका वाढत आहे. वेळेत खबरदारीचे आणि दीर्घकालीन अनुकूलन नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. अहवालात नमूद केले आहे की, प्रभावित लोकसंख्या आणि देश, विशेषतः जे सर्वात जास्त धोक्यात आहेत, त्यांना या संकटाचा सामना करण्यासाठी मदतीसाठी सहज उपलब्ध आणि पूर्वअंदाज लावण्यायोग्य निधी, सुधारित डेटा व वैज्ञानिक क्षमता आणि मजबूत तांत्रिक, संस्थात्मक व कायदेशीर चौकटीची गरज आहे.




