
साखरेची साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ,व्यापाऱ्यांच्या साठा मर्यादेवर थेट निम्म्याने कपात
ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी महागाईची झळ कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. साखरेची साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांच्या साठा मर्यादेवर थेट निम्म्याने कपात केली आहे.तर, दुसरीकडे मागील काही दिवसात केंद्र सरकारने उचललेल्या पावलामुळे गगनाला भिडलेले साखरेचे दर आता जमिनीवर आले आहे.
केंद्र सरकारचा नवा निर्णय…
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत व्यापाऱ्यांना एकावेळी जास्तीत जास्त २,००० क्विंटल साखरेचाच साठा ठेवता येणार आहे. याआधी १ ऑगस्टपासून ही मर्यादा ४,००० क्विंटल होती. मात्र, आता ऐन सणांच्या काळात कृत्रिम तुटवडा निर्माण करून भाव वाढवणाऱ्या साठेबाजांना आळा घालण्यासाठी सरकारने ही वेसण घातली आहे.साखरेच्या दरात मोठी घसरण…
याशिवाय, केंद्राने सप्टेंबर महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात तब्बल १३ लाख टन साखरेचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे. यामुळे नवी मुंबईतील घाऊक बाजारात साखरेचे भाव प्रति किलो ४९ ते ५१ रुपयांवर खाली आले आहेत. घाऊक बाजारात साखरेचे दर किलोमागे ९ ते ११ रुपयांनी घसरले असून, सणासुदीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.




