इन्टॅकच्या कोकण अध्यायाच्या शुभारंभाच्या दिशेने पहिले पाऊल


कसबा संगमेश्वर येथील कर्णेश्वर व कालभैरव मंदिर संकुलाची वारसा अभ्यास सहल संपन्न


चिपळूण : भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला व नैसर्गिक वारशांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय संस्कृती व कला निधी अर्थात इन्टॅक (INTACH) संस्थेच्या कोकण अध्यायाच्या शुभारंभाच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील मौजे कसबा येथील सुप्रसिद्ध पुरातन श्री कर्णेश्वर देवस्थान परिसरात वारसा अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले.

भारतातील अग्रगण्य व नामांकित वारसा संस्थांपैकी एक असलेल्या इन्टॅकच्या देशभरात २१५ हून अधिक शाखा विविध ठिकाणी कार्यरत आहेत. संस्थेमार्फत पुरातन व ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती, हेरिटेज वॉक, वारसा वास्तूंचे दस्तऐवजीकरण तसेच पारंपरिक कला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

कोकण अध्यायाच्या शुभारंभाच्या दिशेने आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्या कार्यक्रमांतर्गत मौजे कसबा परिसरातील प्राचीन श्री कर्णेश्वर मंदिर संकुल व श्री कालभैरव मंदिर संकुलाची वारसा वास्तू अभ्यास सहल संपन्न झाली. या वेळी सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मंदिर संकुलाची पाहणी करून येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची माहिती जाणून घेतली.

या वारसा अभ्यास सहलीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुश्री सायली पलांडे-दातार यांनी भूमिका बजावली. त्यांनी मंदिर संकुलाचा इतिहास, वास्तूंवरील मूर्तीशिल्पकला, कोरीव नक्षीकाम, चित्ताकर्षक कलाकुसर, हस्तकारागिरी तसेच पुरातत्त्व, विज्ञान, धार्मिक आणि आध्यात्मिक पैलूंची संशोधनात्मक माहिती उपस्थितांना दिली.

यावेळी चिपळूण येथील नाणेसंग्राहक गौरव लवेकर यांनी आपल्या संग्रहातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन मांडले. तसेच या नाण्यांच्या इतिहासाविषयी त्यांनी उपस्थितांना छोटेखानी व्याख्यानातून माहिती दिली.

या सहलीमध्ये जनता विद्यालय, आंगवली येथील विद्यार्थी तसेच डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थी व शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते.

कार्यक्रमास अजित राणे, डॉ. गौरव बारटक्के, नेहा राणे, विजय मोरे, पंकज दळवी, कुणाल आणेराव, सिद्धेश लाड, गजानन चितळे, समीर कोवळे, विलास काणे, विनीत विचारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

कोकणातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे संवर्धन आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या वारसा अभ्यास सहलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button