
मतदार यादीत आपले नाव तपासा; ‘रोल ऑब्झर्व्हर’ रुबल अगरवाल यांचे नागरिकांना आवाहन
रत्नागिरी, दि. ३ ) : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या रोल ऑब्झर्व्हर (मतदार यादी निरीक्षक) विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. खेड तहसीलदार आणि खेड पंचायत समितीला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मतदार यादी पुनरीक्षण मोहीम आणि आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
मतदार यादी पुनरीक्षण आणि डिजिटल कामात रत्नागिरी जिल्हा अव्वल ठरला आहे. प्रशासनाने मतदार याद्यांचे प्रारूप प्रसिद्ध केले असून कालपासून हरकती व सूचना नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. असे सांगून श्रीमती अगरवाल म्हणाल्या, रत्नागिरी जिल्हा १०० टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला असून येथे उत्कृष्ट काम झाले आहे. जिल्ह्यात गैरहजर (Absent), स्थलांतरित (Shifted) किंवा मयत (Dead) मतदारांची (ASD) संख्या केवळ ९.९% इतकी कमी आहे. अशा सुमारे १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची पडताळणी केली जात आहे.
नागरिकांना आवाहन
सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी (SDM) कार्यालये, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर (CEO Website) अथवा स्थानिक कार्यालयांत स्वतःचे नाव तपासून घ्यावे. नाव नसल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास फॉर्म ६ आणि ८ भरून नाव नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांसाठी प्रशासन तत्पर
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांच्या सुविधांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावरदेखील उच्चस्तरीय आढावा बैठका पूर्ण झाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गणेशभक्तांना प्रवासात व उत्सवादरम्यान कोणतीही अडचण भासू नये, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबवल्या जात आहेत. प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी पूर्णपणे तत्पर आहे.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय आधिकारी वैशाली पाटील आदी उपस्थित होते.




