मंडणगड नळपाणी योजनेवरून राजकारण; सुनील तटकरे यांच्यावर योगेश कदम यांची टीका

खेड : मंडणगड नगरपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून राजकीय वातावरण तापले असून, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. योजनेचे श्रेय घेण्यापेक्षा प्रत्यक्ष पाठपुरावा महत्त्वाचा असल्याचे सांगत, तटकरे यांना मंत्रालयातील प्रस्तावाच्या सद्यस्थितीचीही माहिती नसल्याचा आरोप त्यांनी केला.
योगेश कदम म्हणाले की, मंडणगड नळपाणी योजनेसाठी नगरविकास विभागाकडे गेल्या एक ते सव्वा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. तत्कालीन नगरविकास मंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला आणि त्यानंतर योजनेला मंजुरी मिळाली.
मात्र, योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या आरोग्य विभागाच्या जागेचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याने काम सुरू होऊ शकलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाकडे पोहोचला असून, आरोग्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मंजुरी मिळाल्यानंतर जागा उपलब्ध होईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना कदम म्हणाले, “मंत्रालयात संबंधित फाईल नेमकी कुठे आहे, याचीही माहिती नसताना केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात या योजनेच्या मंजुरीसाठी त्यांनी कोणताही पाठपुरावा केलेला नाही.” नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवरही त्यांनी निशाणा साधला. “नगराध्यक्षांनीही शासन स्तरावर या योजनेसाठी प्रभावी पाठपुरावा केलेला नाही. आता केवळ राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.
कदम यांनी पुढे सांगितले की, दापोलीच्या राजकारणात प्रवेश करतानाच त्यांनी मंडणगडवासीयांना नळपाणी योजनेचे आश्वासन दिले होते आणि कोणतेही राजकारण न करता एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने ही योजना मंजूर करून घेतली. “या विषयावर मला राजकारण करायचे नाही. नागरिकांना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू होणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button