
रत्नागिरीत ‘रुद्राक्ष डीबी कन्सल्टन्सी’च्या नवीन कार्यालयाचे उद्या उद्घाटन
रत्नागिरी : सहकारी संस्था आणि न्यास (ट्रस्ट) यांच्या कायदेशीर व प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी, तसेच त्यांना सर्वसमावेशक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ‘रुद्राक्ष डीबी को-ऑपरेटिव्ह कन्सल्टन्सी’ आणि ‘देशमुख लीगल असोसिएशन प्रा. लि.’ यांचे नवीन कार्यालय रत्नागिरीत सुरू होत आहे. या कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या (१ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता थिबा पॅलेस रोड, माळ नाका येथील जयेश मंगल पार्कजवळील कार्यालयात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांच्या हस्ते होणार असून, मुंबई शहरचे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक संजय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, सहकारी संस्थांची नोंदणी, अकाउंटिंग, ऑडिट, दोषदुरुस्ती, निवडणुका, सभांचे आयोजन, इतिवृत्त लेखन आणि थकबाकी वसुली यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शनाची मोठी गरज असते. योग्य वेळी मार्गदर्शन न मिळाल्यास संस्थांना आर्थिक व कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा संचालक मंडळावर वैयक्तिक तसेच सामुदायिक जबाबदारी येऊन फौजदारी कारवाईची टांगती तलवार असते. यापूर्वी अशा प्रकारच्या मार्गदर्शनासाठी कोकणातील संस्था चालकांना पुणे किंवा मुंबई येथे जावे लागत असे. मात्र, आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था आणि ट्रस्टसाठी ही सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत आहे.
या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी, स्पेशल ऑडिटर, आर्किटेक्ट, अकाउंटंट, सॉफ्टवेअर तज्ज्ञ तसेच सहकार आयुक्तालय, मंत्रालय आणि उच्च न्यायालयात काम पाहणारे अनुभवी विधिज्ञ सेवा देणार आहेत. पुणे मुख्यालयानंतर रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात यशस्वी घोडदौड केल्यानंतर आता ही संस्था रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विस्तारत आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामकाजाची धुरा स्थानिक पातळीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. दत्तात्रय वालावलकर, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शिका सौ. मनीषा वालावलकर आणि सोहम वालावलकर यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर संस्थांना तत्पर आणि विश्वासार्ह सेवा मिळेल. हा उपक्रम दोन्ही जिल्ह्यांतील सहकारी संस्था, ट्रस्ट, त्यांचे सभासद, विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, उद्घाटन समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वालावलकर परिवार व देशमुख लीगल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.




