
लांजा तालुक्यात वन्यप्राण्यांचा वाढता वावर शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय
लांजा तालुक्यात वन्यप्राण्यांचा वाढता वावर शेतकर्यांसाठी चिंतेचा विषय बनला असून, विशेषतः गव्यांच्या कळपांमुळे बागायती, पिके आणि रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्यातील झापडे गावात नुकत्याच घडलेल्या घटनेत गव्यांच्या कळपाने शेतकरी मधुकर गोविंद पालये यांच्या खैर रोपवाटिकेत धुमाकूळ घालत हजारो खैर रोपे अक्षरशः उद्ध्वस्त केली. या घटनेत त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मधुकर पालये यांनी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या मेहनतीने खैर रोपवाटिका विकसित केली होती. खैराच्या दर्जेदार रोपांना सध्या वनविभाग, शासकीय वृक्षलागवड मोहिमा तसेच खासगी शेतकर्यांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे ही रोपवाटिका त्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार ठरणार होती. मात्र, रात्रीच्या वेळी गव्यांच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण रोपवाटिकेची नासधूस केली. अनेक रोपे चिरडली गेली, तर काही मुळासकट उखडली गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com




