
लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीतील वायूच्या त्रासानंतर आवाशीतील कामगाराचा मृत्यू
लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल कंपनीत काम करत असताना वायूच्या त्रासामुळे प्रकृती बिघडलेल्या आवाशी येथील एका अनुभवी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आवाशी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत कामगाराचे नाव सुधीर बाळकृष्ण आंब्रे (वय ५८, रा. गणेशनगर, आवाशी, ता. खेड) असे आहे. ते घरडा केमिकल कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर आंब्रे हे १५ जून रोजी सकाळच्या पाळीत कामावर हजर झाले होते. काम सुरू असताना सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना कंपनीच्या वैद्यकीय केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कंपनीच्या रुग्णवाहिकेतून घरडा रुग्णालयात हलविण्यात आले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सुधीर आंब्रे यांनी घरडा कंपनीत सुमारे ३५ वर्षे सेवा बजावली होती. कंपनीतील कर्मचारी संघटनेच्या कामातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. धर्माधिकारी संप्रदायाचे निरुपणकार म्हणूनही त्यांची ओळख होती. आणखी अवघ्या आठ महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते.
मनमिळाऊ, शांत आणि सामाजिक स्वभावामुळे सुधीर आंब्रे हे पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला




