
हॉटेलच्या आवारात खेळताना दुर्दैवी घटना; तीन वर्षीय चिमुरडीचा चाकाखाली येऊन मृत्यू
दापोली तालुक्यातील हर्णे-आंजर्ले बायपास मार्गावरील एका हॉटेलच्या आवारात घडलेल्या दुर्दैवी अपघातात तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. चारचाकी वाहन मागे घेत असताना ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (८ जून) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हर्णे-आंजर्ले बायपास मार्गावरील लेमन ट्री हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. गणपती प्रेमु राठोड (वय ३८, व्यवसाय मजुरी) यांची मुलगी सान्वी (वय ३ वर्षे) हॉटेल परिसरातील वडाच्या झाडाखाली झोपलेली होती.
याचवेळी बापू हिरामण पवार (रा. जालगाव सुतारकोंड) हे त्यांच्या ताब्यातील क्रेटा (एमएच-०८-एएन-५८८७) ही चारचाकी गाडी मागे घेत होते. वाहन मागे घेताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने गाडीचे चाक सान्वीच्या डोक्यावरून गेल्याचा आरोप आहे. या गंभीर अपघातात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.




