
बिनविरोध निवडीनंतर अनिकेत तटकरे यांचे सावर्डेत गोविंदराव निकमांच्या समाधीस्थळी अभिवादन
चिपळूण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे भेट देत माजी खासदार तथा शिक्षणमहर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी त्यांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहत आशीर्वाद घेतले.
विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्यानंतर तटकरे यांनी कोकणातील ज्येष्ठ नेत्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा क्रम सुरू ठेवला असून, त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सावर्डे येथे भेट दिली. शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्याविषयी आदर व्यक्त करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
यावेळी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, अनिरुद्ध निकम, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, अजय बिरवटकर, संजय कदम यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अनिकेत तटकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच विधान परिषदेवरील बिनविरोध निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी झालेल्या अनौपचारिक संवादात उपस्थितांनी तटकरे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत कोकणच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. तटकरे यांनीही सर्वांचे आभार मानत कोकणातील विकासकामे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सावर्डे येथे झालेल्या या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून, महायुतीतील नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तटकरे यांच्यावरील विश्वास आणि पाठिंबा व्यक्त केला.




