
तुकाराम मुंढे यांची ग्वाही; दूध, दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ हद्दपार करणार!
राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. त्यामुळे एकीकडे ग्राहकांची फसवणूक होते, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतात. दुसरीकडे दुधाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे दूध आणि दूधजन्य पदार्थांमधील भेसळी विरोधात प्राधान्याने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डेअरी उद्योगाच्या शिष्टमंडळाला दिली आहे.
दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ, ज्येष्ठ संचालक श्रीपाद चितळे, आबासाहेब थोरात आदींनी मुंढे यांची भेट घेतली. दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ थांबविण्यावर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीवर प्राधान्याने कारवाई करणार आहोत. अन्न व औषध विभागाच्या प्रयोगशाळांची क्षमता आणि संख्या वाढविण्याचे नियोजन आहे. निकृष्ट पनीर विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. त्यामुळे दुधापासून बनवलेल्या पनीरला बाजारपेठेत मागणी वाढलेली आहे. हॉटेलमध्ये आमच्याकडे दुधापासून बनविलेल्या पनीरपासून केलेल्या भाज्या, असे फलक लागायला लागले आहेत. ग्राहकांना निर्भेळ उत्पादने मिळायला हवीत. ग्राहकाला चांगले दूध व शेतकऱ्याला योग्य तो दर मिळायला हवा हेच आमचे धोरण आहे. ग्रामीण भागामध्ये दूध हा प्रमुख अर्थार्जनाचा स्त्रोत असून, त्यामध्ये चुकीचे वागणाऱ्यांना थारा मिळणार नाही, असेच धोरण राहील, असेही मुंढे म्हणाले. डेअरी उद्योगांच्या प्रतिनिधींसोबत एका बैठकीचेही आयोजन केले जाणार आहे.




