
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा लवकर!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकर जाहीर केल्यानंतर आता पुरवणी परीक्षाही दर वर्षीच्या तुलनेत लवकर घेतली जाणार आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा १६ ते ३० जून दरम्यान, तर बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.
राज्य मंडळातर्फे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणीसुधार परीक्षा आयोजित करण्यात येते. गेली काही वर्षे ही परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये आयोजित केली जात होती. मात्र, यंदा जून-जुलैमध्येच पुरवणी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार बारावीची सर्वसाधारण, द्विलक्ष्यी, व्यवसाय अभ्यासक्रम, माहिती-तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन, लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. त्याच कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा १६ ते ३० जूनदरम्यान आयोजित केली जाणार असून, त्याच कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा होणार असल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे.
परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, समाजमाध्यमे किंवा तत्सम माध्यमातून उपलब्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास राज्य मंडळ जबाबदार राहणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.




