
पाच महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात दुपटीने वाढ, अनेक ठिकाणी दरवाढ
देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून १९ किलोच्या सिलिंडरमागे ४२ रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. दि. १ जूनपासून लागू झालेल्या या वाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग व्यवसाय आणि कौटुंबिक समारंभांच्या खर्चावर थेट परिणाम होणार आहे. मात्र, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष आणि इंधन पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजीच्या किमती सातत्याने वाढत असून, जानेवारीनंतर अवघ्या पाच महिन्यात दर जवळपास दुप्पट झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये ४९ रुपये, मार्चमध्ये ११५ रुपये, एप्रिलमध्ये तब्बल १९३ रुपये आणि जूनमध्ये पुन्हा ४२ रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांवरील आर्थिक ताण वाढला आहे. परिणामी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन दरानुसार दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३,११३.५० रुपये, मुंबईत ३,०६७.५० रुपये, तर कोलकात्यात ३,२५५.५० रुपये झाली आहे. कोलकात्यात सर्वाधिक ५३.५० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, ५. किलोच्या छोट्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या सिलिंडरची किंमत आता ८२१.५० रुपये झाली असून, स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि छोटे व्यावसायिक यांनाही या दरवाढीचा फटका बसणार आहे.
www.konkantoday.com




