
’प्रधानमंत्री सूर्यघर’मध्ये महाराष्ट्र देशात अव्वल
छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत दि. २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले असून त्यापैकी ४,७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळिवला. या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले असून, राज्याने ६ लाखापेक्षा अधिक घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविणार्या निवडक राज्यांच्या गटात प्रवेश केल्याबद्दलही कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीने वेग घेतला आहे. मे महिन्यात योजनेसाठी सादर अर्जामध्ये देशात प्रथम क्रमांक, प्रकल्प बसविलेल्या एकूण घरांमध्ये दुसरा क्रमांक, प्रकल्पांच्या तपासणीमध्ये पहिला क्रमांक आणि पुरवठादारांच्या नोंदणीमध्ये दुसरा क्रमांक अशा रितीने या योजनेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सर्वोच्च कामगिरी करणार्या पाच टॉपर राज्यांमध्ये समाविष्ट झाला आहे.www.konkantoday.com




