राजापूरात बनावट विदेशी मद्यविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई,कारवाईत एकूण १ लाख ५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत


*राजापूर, तालुक्यात गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्याची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य व बीअरचा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मा. डॉ. राजेश देशमुख, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, श्री. प्रसाद सुर्वे, संचालक (अंमलबजावणी व दक्षता), श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग तसेच श्रीमती किर्ती शेडगे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १३ मे २०२६ रोजी दोन पंचांसह मौजे सोलये गाव हद्दीत, राजापूर रेल्वे स्टेशन शेजारील घर क्रमांक ४०९ च्या मागील परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान गोविंद बुधाजी सौंदळकर (वय ५८, रा. सोलये, राजापूर रेल्वे स्टेशन रोड, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांच्या ताब्यातून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १८० मिली मापाच्या “बॉक्स ओडका” विदेशी मद्याच्या ५७६ बाटल्या, “हनी ब्लेंड”च्या २८८ बाटल्या, “डीएसपी ब्लॅक”च्या २८ बाटल्या, “मॅकडॉल नं. १”च्या २२ बाटल्या तसेच ६५० मिली मापाच्या “एलबी स्ट्राँग” बीअरच्या ४६ बाटल्यांचा समावेश आहे.

या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५ हजार ६७० रुपये इतकी असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

या प्रकरणी आरोपी गोविंद बुधाजी सौंदळकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईत निरीक्षक आर. जी. मोरे, जवान सुर्वे, जवान लोढे, जवान उबाळे तसेच महिला जवान श्रीमती घुडे यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button