
अजितदादा गटातील संघर्ष विकोपाला; सुनील तटकरे, प्रफुल पटेल भाजपच्या वाटेवर…
Intra-party conflict escalates : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेतृत्वावरून मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला पक्षांतर्गत संघर्ष विकोपाला गेला आहे. यामुळे पक्षात अस्वस्थ असलेले प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 22 आमदारांसह हे दोन्ही नेते भाजपकडून निवडणूक लढणार असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यापासून तटकरे आणि पटेल यांचे संघटनात्मक महत्त्व कमी करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पदाधिकाऱयांना वाटप करण्यात आलेल्या कामांबाबत जी यादी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली त्यामध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत नाव असले तरी पदाचा उल्लेखच करण्यात आलेला नाही. हा प्रकार उघडकीस येताच सुनेत्रा पवार यांनी तांत्रिक चुका झाल्याची सारवासारव केली असली तरी पार्थ पवार यांनी तटकरे आणि पटेल यांचे पंख कापल्याचे बोलले जात आहे. हा वाद असाच सुरू राहिल्यास तटकरे, पटेल आदी नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
गुवाहाटी ते मुंबई फडणवीसांसोबत प्रवास
पक्षसंघटनेत डावलले जात असल्याने तटकरे आणि पटेल नाराज आहेत. त्यामुळेच मंगळवारी गुवाहाटीवरून येताना या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत विमानाने न येता फडणवीस यांच्यासोबत मुंबईपर्यंत विमान प्रवास केल्याने चर्चांना उधाण आले आहे.




