
कापसाळ गोसावी स्टॉप येथे आयशरची कंटेनरला धडक; चालक जखमी
नरेंद्राचार्य संस्थेच्या रुग्णवाहिकेतून जखमी चालकाला रुग्णालयात दाखल

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ गोसावी स्टॉप येथे सोमवारी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास आयशर गाडीने कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. या दुर्घटनेत आयशर चालक जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून लोटेच्या दिशेने जाणारी आयशर गाडी क्रमांक MH 08 W 8451 कापसाळ गोसावी स्टॉप येथे आली असता पुढे जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडकली. अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावर न थांबता पुढील दिशेने वाहन घेऊन निघून गेल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्मेंट रेस्ट हाऊसजवळ तैनात असलेली जगतगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानची 24 तास अपघात सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सत्यम पवार यांनी जखमी चालकाला तात्काळ उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
जखमी आयशर चालकाचे नाव युसुफ सोलकर असून ते रत्नागिरी, मिरकरवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अपघाताबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.




