
खेडला दुष्काळी तालुका जाहीर करा!
८० टक्के शेती कोरडवाहू; पावसाच्या खंडामुळे भातशेती संकटात — राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जलालुद्दीन राजपूरकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खेड : खेड तालुका हा बहुतांश डोंगराळ आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा असून तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेती कोरडवाहू आहे. पावसाचे एकूण प्रमाण समाधानकारक दिसत असले, तरी येथील जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने शेती मोठ्या प्रमाणात पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे पावसात पडणाऱ्या खंडाचा थेट परिणाम भातशेतीवर होत असून, खेड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस जलालुद्दीन राजपूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात राजपूरकर यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात खेड तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती, शेतीचे स्वरूप तसेच पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेती कोरडवाहू, तर केवळ २० टक्के शेती पाणथळ असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांत पावसाने मोठा खंड दिल्याने फुटीच्या अवस्थेत आलेल्या भातशेतीवर पाण्याअभावी परिणाम झाला आहे. पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असून यामुळे यंदाच्या भात उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
खेड तालुक्यात शासनाच्या निकषानुसार पावसाचे प्रमाण समाधानकारक दिसत असले, तरी प्रत्यक्षात डोंगराळ भौगोलिक रचना आणि जमिनीची कमी जलधारण क्षमता यामुळे पावसाचे पाणी साठून राहत नाही. परिणामी, पावसाचा खंड पडताच कोरडवाहू शेतीला त्याचा मोठा फटका बसतो. ‘उभ्या पावसावर’ अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी पावसातील खंड हा गंभीर संकटाचा विषय बनला आहे, असे राजपूरकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
उत्तर रत्नागिरीतील खेड, चिपळूण, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने भातशेती संकटात आली असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यातील २८४ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा सुरू असताना खेड तालुक्याचा त्यामध्ये समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खेड तालुक्याचा दुष्काळी तालुक्यात समावेश करावा आणि दुष्काळी तालुक्यांप्रमाणेच येथील शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत व आवश्यक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी जलालुद्दीन राजपूरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
“खेड तालुक्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या खंडामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून खेडचा दुष्काळी तालुक्यात समावेश करावा,” अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.




