
खेडच्या रोजगार महाकुंभात ‘भूमिपुत्रांच्या कायम नोकऱ्यां’चा मुद्दा ऐरणीवर!
लोटे एमआयडीसीतील १५० हून अधिक कंपन्यांपैकी केवळ १५ कंपन्यांचा सहभाग; ॲड. वैभव खेडेकरांची तीव्र नाराजी
खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ खेड येथे उत्साहात पार पडला. राज्यव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आयोजित या रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. खेड परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, भाजप नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागातील (HR) अधिकारी व प्रतिनिधींशी थेट संवाद साधत स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा मुद्दा ठामपणे मांडला.
स्थानिक तरुणांना केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या नोकऱ्या न देता त्यांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी भूमिका ॲड. खेडेकर यांनी मांडली. कंपन्यांनी स्थानिक युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या नाहीत, तर त्याबाबत जाब विचारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये दीडशेहून अधिक कंपन्या कार्यरत असताना रोजगार महाकुंभात केवळ १५ कंपन्यांनी सहभाग नोंदवल्याबद्दल ॲड. वैभव खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्थानिक औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या संख्येने उद्योग कार्यरत असताना रोजगार मेळाव्यात त्यांचा व्यापक सहभाग अपेक्षित होता. स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांनी अशा उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
खेड परिसरातील तरुणांमध्ये विविध कौशल्ये असून त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यांनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून कंपन्या आणि स्थानिक युवक यांच्यात थेट संवाद निर्माण झाल्याने रोजगाराच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर, नगराध्यक्षा माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, भाजपा नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड तालुकाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष उर्मिला शेट्ये-पाटणे, माजी नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्षा आशा सनगरे, नगरसेवक निकेतन पाटणे, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संदेश भुवड, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय तोडकरी, भाजपा खेड शहर सरचिटणीस विजय गुप्ता, भाजपा सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, विनायक शिरगावकर, आनंद खेडेकर, बाळू वर्मा, श्याम तावडे, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.
लोटे एमआयडीसीतील उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात, तसेच रोजगार मेळाव्यांमध्ये स्थानिक कंपन्यांचा व्यापक सहभाग वाढावा, हा मुद्दा या रोजगार महाकुंभाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




