
दुसऱ्या संधीसाठी पीसीएम समूहाची सीईटी आजपासून, राज्यात दुसऱ्या संधीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार!
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा १२ ते २० मे दरम्यान सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. राज्यात दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत. पीसीएम समूहाच्या सीईटीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यातील १९४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
पीसीएम समूहाच्या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ३ लाख २१ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या नोंदणीमध्ये १ लाख ९७ हजार ८८३ विद्यार्थी, १ लाख २४ हजार ०७१ विद्यार्थीनी, १३ तृतीयपंथी व ९६८ दिव्यांग विद्यार्थ्यांचा सावेश आहे. ही सीईटी ऑनलाईन होणार आहे.
पहिल्या संधीच्या सीईटीसाठी ९४.७३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
राज्यातील विद्यार्थ्यांना यंदापासून प्रथमच पीसीएम समूहासाठी सीईटीच्या दोन संधी मिळत आहेत. पहिल्या संधीची सीईटी ११ ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत झाली. राज्यात पहिल्या संधीच्या सीईटीसाठी ४ लाख ७९ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ५४ हजार ७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेला ९४.७३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रथमच प्रवेश परीक्षेच्या दोन संधी
राष्ट्रीय स्तरावर जेईईच्या (मुख्य) दोन प्रवेश परीक्षा होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा संधी उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील मुलांनाही दोन संधी मिळाव्यात यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर्षापासून एमएचटी सीईटी (पीसीएम), एमएचटी सीईटी (पीसीबी) व एमबीए-एमएमएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) दोन वेळेस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून, दुसरी प्रवेश परीक्षा ऐच्छिक असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करतानाच दोन प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत की एक प्रवेश परीक्षा द्यायची हे विचारण्यात येत होते. जर विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास तर त्याला दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त पर्सेंटाईल मिळतील तो निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




