त्रिपुरारी पौर्णिमेला श्री क्षेत्र परशुरामच्या डोंगरमाथ्यावरील ऐतिहासिक पणतीचे मंगळवारी प्रज्वलन

२३ वर्षांपासून दीपप्रज्वलनाची परंपरा सुरू; सायंकाळी ६.३० वाजता होणार सोहळा



चिपळूण : प्रति पंढरपूर आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र परशुराम येथील महेंद्रगिरी पर्वताच्या उंच शिखरावरील पुरातन भव्य पणतीचे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी प्रज्वलन करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता भगवान श्री परशुराम मंदिरातून मशाल पेटवून डोंगरमाथ्यावर नेण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता ऐतिहासिक पणती प्रज्वलित केली जाणार आहे.

श्री क्षेत्र परशुराम येथील ही दीपमाळ शिवकालीन असल्याचे सांगितले जाते. महेंद्रगिरी पर्वतावरील उंच शिखरावर जांभ्या दगडात कोरलेली ही भव्य दीपमाळ असून, त्यावरील पणती काळ्या दगडात तयार करण्यात आली आहे. या ठिकाणाहून चिपळूण शहर, श्री परशुराम मंदिर आणि सह्याद्रीच्या मुख्य व उपरांगांचे विहंगम दृश्य दिसते. परशुराम गावातील पायरवाडीतून जंगलमय, गवताळ आणि डोंगराळ पायवाटेने या दीपमाळेपर्यंत जाता येते.

या पणतीच्या प्रज्वलनासाठी सुमारे १५ लिटर गोडेतेल आणि वातीसाठी एक धोतर वापरण्याची परंपरा आहे. पूर्वी ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थानतर्फे दरवर्षी तेल आणि धोतर देण्यात येत असे. ही ऐतिहासिक परंपरा श्री ग्रामदैवत जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट, चिपळूण यांच्यातर्फे गेल्या २३ वर्षांपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

पूर्वी या पणतीचा प्रकाश भगवान श्री परशुराम यांच्या मूर्तीवर पडत असे, असे जाणकार सांगतात. त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री या पणतीचा प्रकाश चिपळूण शहर आणि परिसरातूनही दिसतो. हा दीप पाहून भाविक भगवान श्री परशुरामांना वंदन करतात. याच दिवशी सायंकाळी भगवान श्री परशुराम मंदिरात पारंपरिक तुळशी विवाह सोहळाही संपन्न होणार आहे.

या दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी परशुराम येथील ग्रामस्थ तसेच चिपळूण शहर व परिसरातील भक्तगण आणि कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. परशुरामभक्तांनी या सोहळ्यात सहभागी होऊन ऐतिहासिक दीपदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान श्री भार्गवराम परशुराम यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button