‘आपुलकीचा मुक्काम’ उपक्रमातून महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांची जिल्हा परिषद शाळेला भेट


रत्नागिरी, दि. २२ ) – ग्रामीण भागातील जीवनशैली, सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न आणि गावपातळीवरील अडचणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेण्यासाठी ‘आपुलकीचा मुक्काम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, गावोगावी अशाच पद्धतीने पारंपरिक घरांमध्ये मुक्काम करून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा माझा मानस आहे, असा निर्धार महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या आंबवली गावात राज्यमंत्री श्री. कदम यांनी ‘आपुलकीचा मुक्काम’ केला. मातीच्या आणि कौलारू कोकणी पारंपरिक घरात त्यांनी रात्रभर मुक्काम करत गावची संस्कृती जवळून अनुभवली. कोकणात अशी पारंपरिक घरे आता काळाच्या ओघात दुर्मिळ होत असली, तरी येथील माणसांमधील प्रेम, जिव्हाळा आणि आत्मीयता आजही टिकून असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शाळेला सदिच्छा भेट; चिमुकल्यांशी संवाद
मुक्कामादरम्यान श्री. कदम यांनी आंबवलीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. यावेळी शाळकरी मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जिल्हा परिषद शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जात असून, या शाळांना अधिक पायाभूत व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाणीटंचाईवर बंधाऱ्यांची मोहीम
जिल्ह्यातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर देताना श्री कदम म्हणाले,

  • प्रशासनाच्या माध्यमातून बंधारे बांधण्यात येत आहेत.
  • मतदारसंघाच्या पातळीवर यापूर्वीच दोन हजार बंधारे यशस्वीरीत्या उभारण्यात आले आहेत.
  • आगामी ८ ते ९ महिन्यांत लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांच्या लोकसहभागातून जलसंधारणाची ही कामे वेगाने पूर्ण करून जिल्ह्याला पाणीटंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button