हवामान आधारित फळपीक विमा योजना: नारळ व सुपारी पिकाच्या विम्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक; कृषी विभागाचे आवाहन


रत्नागिरी, दि,२२ ): बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर होणारा विपरीत परिणाम आणि शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन, कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत यंदा नारळ व सुपारी या पिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सन २०२६-२७ च्या आंबिया बहारासाठी विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ असून आता केवळ शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
*अधिसूचित महसूल मंडळे: जिल्ह्यात नारळ पिकासाठी ५३ महसूल मंडळे, तर सुपारी पिकासाठी २३ महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.

  • सहभाग ऐच्छिक: कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे नसल्यास, मुदतीच्या ७ दिवस आधी संबंधित बँकेत नाहरकत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.
  • भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी: खातेदारांप्रमाणेच कुळ व भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही योजना लागू असून, त्यांना नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • क्षेत्र मर्यादा: एका शेतकऱ्यास किमान ०.१० हेक्टर ते जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा उतरवता येईल.
    विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हप्ता:
  • नारळ पीक: विमा संरक्षित रक्कम रु. १,७०,००० प्रति हेक्टर असून शेतकऱ्याचा हप्ता रु. ८,५०० प्रति हेक्टर आहे.
  • सुपारी पीक: विमा संरक्षित रक्कम रु. १,००,००० प्रति हेक्टर असून शेतकऱ्याचा हप्ता रु. ५,००० प्रति हेक्टर आहे.
    सहभागासाठी आवश्यक अटी व अर्ज प्रक्रिया:
  • आवश्यक बाबी: विमा नोंदणीसाठी Agristack अंतर्गत ‘शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID)’ असणे आणि ‘ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप’ मध्ये फळपिकाची नोंद केलेली असणे बंधनकारक आहे.
  • अर्ज कोठे करावा? आपले सरकार सेवा केंद्र (CSC), बँक किंवा www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने हप्ता भरता येईल. अर्जासोबत फळबागेचा Geo-Tagging असलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • विमा कंपनी: जिल्ह्यासाठी ही योजना बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जात आहे.
    नुकसान भरपाई व हवामान प्रमाणके:
    मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रांवर नोंदवल्या जाणाऱ्या पर्जन्यमान, तापमान, वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता या निकषांवर नुकसान भरपाई निश्चित केली जाते. वेगाच्या वाऱ्यामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनी अथवा कृषी विभागाकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.
    अंतिम टप्प्यात होणारी धावपळ व तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी गावातील सहायक कृषी अधिकारी, तालुका कृषी विभाग किंवा विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी प्रतिकेश शिगवण (मो. ९८८१९६७२३३) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button