
२६ ऑक्टोबरपासून ‘भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताह’ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पुढाकार; लाचखोरांना आळा घालण्यासाठी नागरिकांना थेट तक्रारीचे आवाहन
रत्नागिरी, दि. २२ (जिमाका): प्रशासनात पारदर्शकता यावी आणि नागरिकांमध्ये लाचखोरीविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने जिल्ह्यात २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. लाचखोरांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी थेट तक्रारी द्याव्यात असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
सप्ताहभरात जिल्ह्यात भ्रष्टाचार निर्मूलनाचा संदेश दिला जाणार आहे. यामध्ये खालील उपक्रमांचा समावेश असेल:
- संघटनांसोबत बैठका: ग्रामपंचायती, रिक्षा संघटना आणि व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठका घेऊन मार्गदर्शन केले जाईल.
- तरुणाईला प्रेरणा: शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, अभ्यासपूर्ण चर्चासत्रे, निबंध स्पर्धा आणि पथनाट्यांचे सादरीकरण होणार आहे.
- नागरिकांशी संवाद: योग वर्ग, व्यायामशाळा आणि ज्येष्ठ नागरिक संघांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचून चर्चासत्रे आयोजित केली जातील.
लाच मागणाऱ्यांविरुद्ध थेट करा तक्रार
कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी अधिकारी वा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास अजिबात घाबरू नका किंवा लाच देऊ नका; त्याऐवजी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून कायदेशीर कारवाईस सहकार्य करा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक व माहिती कक्ष
नागरिकांना तक्रार किंवा गोपनीय माहिती देण्यासाठी खालील संपर्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत:
टोल फ्री क्रमांक: १०६४
कार्यालयीन दूरध्वनी: ०२३५२ – २२२८९३
व्हॉट्सॲप हेल्पलाईन: ७०३८३९१०६४
*ई-मेल: *dyspacbratnagiri@mahapolice.gov.in*
अधिकारी संपर्क क्रमांक:
पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील: ७५८८९४१२४७
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव: ९८७०४७४५३५
पोलीस निरीक्षक सुहास रोकडे: ९०६७०३५९१०
भ्रष्टाचारमुक्त जिल्हा घडवण्यासाठी प्रत्येक सजग नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.




