पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी पोलीस दलातर्फे शूर पोलिसांना भावपूर्ण श्रद्धांजली


रत्नागिरी : पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे बुधवारी (२१ ऑक्टोबर) पोलीस कवायत मैदान, रत्नागिरी येथे कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शोकशस्त्र सादर करून करण्यात आली. त्यानंतर देशाच्या विविध भागांत कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या १५४ शूर पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या नावांचे वाचन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
या प्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट शैलेश गुप्ता, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांच्या अतुलनीय शौर्याला, त्यागाला आणि कर्तव्यनिष्ठेला यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button