
बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार २ लाख १४ हजार मताधिक्याने विजयी, अजित पवार यांचा विक्रम मोडला!
बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने विजयी साकारला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला.
अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अजित पवार यांचा बारामतीतील मताधिक्याचा विक्रम मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळविले.
बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले. बारामतीतील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर होता. अजित पवार यांनी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. हा विक्रम मोडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दोन लाख १४ हजार ९३ मताधिक्याने विजयी झाल्या.
बारामतीतील एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम येथे सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टपाली आणि पहिल्या फेरीपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आघाडीवर होत्या. पहिल्या फेरीत ६५०० मते मिळवत त्यांनी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीअखेर १६५४३ मते, तिसऱ्या फेरी २६७७३ मते, पाचव्या फेरी अखेर ४४७९६ मते, सहाव्या फेरीअखेर ५० हजार मतांचा आकडा पार करण्यात आला. त्यानंतर मताधिक्य वाढत गेले. २४ व्या फेरीअखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विक्रमी मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले.
विरोधी उमेदवारांना अवघे ४८३७ मते
या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकाही उमेदवार नव्हता. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २० अपक्ष उमेदवार होते. त्यामध्ये बारामतीतीलच आठजण, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावातील एक अपक्ष उमेदवार, धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांचा समावेश होता. ‘नोटा’सह या सर्वांना मिळून अवघी ४८३७ मते मिळाली.
‘अजित पवारांच्या स्मृतींना विजय समर्पित’
बारामतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विजयाचा जल्लोष नको, कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये,’ असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ‘आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
‘आजचा हा निकाल जाहीर होत असताना दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.




