आगम कॉलेज ऑफ ॲप्लाइड आर्टमध्ये “इलस्ट्रेशन”वर कार्यशाळा संपन्न

रत्नागिरी : येथील आगम कॉलेज ऑफ ॲप्लाइड आर्ट येथे ग्राफिक डिझाईन क्षेत्रासंबंधित इलस्ट्रेशन या अत्यंत आगळ्या वेगळ्या खास विषयावरील कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा मूळ रत्नागिरीकर आणि गेली बरीच वर्षे मुंबईमध्ये स्थायिक असणारे अनीश दाते यांनी घेतली.

दाते यांनी सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ ॲप्लाइड आर्ट या संस्थेत उपयोजित कलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर ग्राफिक डिझाइनर – इलस्ट्रेटर म्हणून स्वतंत्रपणे नामवंत जाहिरात कला संस्था, फार्मा हेल्थकेअर आणि प्रकाशन व्यवसाय अशा विविध क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत आहेत.

उज्ज्वल शिक्षण मंडळाच्या आगम कॉलेज ऑफ ॲप्लाइड आर्टचे प्राचार्य संदेश पालये यांच्या हस्ते श्री. दाते यांचा शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
इलस्ट्रेशन म्हणजे चित्रांकन या खास विषयाबाबत दाते यांनी आपल्या व्यावसायिक कामाचे नमुने पेश करून या कलेबाबत शास्त्रोक्त परिचय करून दिला. जाहिरात संस्था, फिल्म -ॲनिमेशन , प्रकाशन व्यवसाय, इंटिरियर – डिस्प्ले सेट डिझाईन इत्यादी अनेक क्षेत्रात चांगल्या कुशल इलस्ट्रेटर्सना मागणी असून यात स्टोरीबोर्ड आर्टिस्ट, कार्टूनिस्ट – कॅरिकेचर इत्यादी प्रकारच्या स्पेशलायझेशनची माहिती दिली. कलेला मरण नसतं हे सांगताना कलेला आधुनिक डिजिटल सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर हाताने केलेल्या नियमित सरावाला, मॅन्युअल आर्टवर्कसना पर्याय नसतो हे विषद केले.

कार्यशाळेमध्ये उपस्थित कलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इलस्ट्रेशनमधील व्यक्तिरेखा म्हणजे कॅरेक्टर डिझाईनचा विषय देण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने चित्रित केलेल्या विविध कच्च्या व्यक्तिरेखांवर आपला कुशल हात फिरवत नाना प्रकारच्या व्यक्तिरेखा जोरदारपणे रेखाटून दाखवत दाते यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरांनंतर आणि लाभलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे अशी खास कार्यशाळा लवकरच जुलै २०२६ मध्ये घेण्याचा मनोदय प्राचार्य संदेश पालये यांनी समारोपामध्ये व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button