
देवगड समुद्रात पर्ससीन नौका बुडाली! २० खलाशी बचावले
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र परिसरात मच्छिमारी करून बंदराकडे परतणारी ’अलमका’ ही पर्ससीन नौका अचानक आलेल्या वादळी वार्यांच्या तडाख्यात सापडली आणि काही क्षणांतच समुद्राच्या खोल गर्तेत बुडाली.
या बोटीवर असलेल्या २० खलाशांचा जीव थोडक्यात वाचला आहे, मात्र बोटीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना इतकी अचानक घडली की, जर वेळेवर मदत मिळाली नसती तर ही दुर्घटना मोठ्या जीवितहानीत बदलली असती. मात्र स्थानिक मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे सर्व खलाशांचे जीव वाचवण्यात यश आले. ’अलमका’ ही नौका देवगड किनार्याजवळील मिठमुंबरी ते पवनक्की या समुद्री पट्ट्यात मच्छिमारी करून परतत होती. त्या वेळी अचानक हवामानात बदल झाला. वार्याचा वेग प्रचंड वाढला आणि समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या. नौकेवरील तांडेल आणि खलाशी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, मात्र समुद्राचे रौद्ररूप इतके तीव्र होते की नौकेचा तोल गेला आणि काही मिनिटांतच ती बुडाली. नौकेवर सुमारे १५ ते २० खलाशी होते. वादळी परिस्थितीत ते सर्वजण जीव मुठीत धरून होते. नौका बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने मदतीसाठी सिग्नल दिला. संकटाचा संदेश मिळताच स्थानिक मच्छिमारांच्या आसपासच्या बोटी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. खडतर परिस्थितीत त्यांनी बचावकार्य सुरू केले. उंच लाटा आणि जोरदार वार्याच्या विरोधात जाऊन त्यांनी सर्व खलाशांना सुरक्षितपणे किनार्यावर आणले. या धाडसी कामगिरीमुळे एक मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे. ’अलमका’ ही नौका पूर्णपणे बुडाल्याने मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com




