उद्योगांना मोठा शॉक! महावितरणचा वीज विक्री कर वाढवला; ‘या’ कारणासाठी ग्राहकांच्या खिशातून पैसे जाणार!


शासनासह महावितरण एकीकडे सर्व संवर्गातील ग्राहकांचे वीजदर कमी केल्याचा दावा करते, दुसरीकडे उद्योग व व्यावसायिक ग्राहकांवर नव्या करवाढीचा भार टाकण्यात आला आहे. ‘पी.एम. कुसुम टप्पा ब’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनांसाठी निधी उभारण्याच्या नावाखाली शासनाने वीज विक्री करात प्रतियुनिट ९.९० पैशांची वाढ केली आहे. त्यामुळे महावितरणच्या औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांचे वीजदर वाढणार आहेत. या निर्णयासंदर्भात महावितरणच्या मुख्यालयाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

महावितरणने बुधवारी (१५ एप्रिल) काढलेल्या परिपत्रकानुसार, ही करवाढ १ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. त्यानुसार औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांसाठी शहरी भागात वीज विक्री कर प्रतियुनिट १९.०४ पैशांवरून २८.९४ पैशांपर्यंत, तर ग्रामीण भागात १८ पैशांवरून २७.९० पैशांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच दोन्ही गटांसाठी प्रतियुनिट ९.९० पैशांची वाढ झाली आहे. वीज विक्री करातून मिळणारी रक्कम राज्य सरकारच्या खात्यात जमा होते. याचा उपयोग शासनाच्या ‘पी.एम. कुसुम टप्पा ब’ आणि ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनांसाठी केला जाणार आहे.

या योजनेंतर्गत मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार असून, त्याचा बहुतांश खर्च राज्य शासन उचलणार असल्याचे महावितरणच्या परिपत्रकात नमूद आहे. या निर्णयामुळे उद्योग क्षेत्रात नाराजी वाढत आहे. आधीच रूफटॉप सोलर प्रकल्प बसवून सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांवर महावितरणने ग्रिड सपोर्ट चार्ज आणि ‘टाइम ऑफ डे’ नियमांतील बदलांमुळे अतिरिक्त आर्थिक भार टाकला आहे. परिणामी औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचे वीजदेयक मोठ्या प्रमाणात वाढले. आता नव्याने करण्यात आलेल्या वीज विक्री कर वाढीमुळे उद्योगांसह व्यावसायिक ग्राहकांवर आणखी आर्थिक बोजा पडणार आहे.

शेतकरी व सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने मुख्यमंत्री फडणवीस काम करत आहेत. सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना राबवली जात आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊन त्यांचे अर्थकारण मजबूत व्हावे, यासाठी अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचवण्यासाठी वीज विक्री करात तात्पुरती वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, उद्योगांचे वीजदर अलीकडेच कमी केले असून ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होतील. त्यामुळे ही तात्पुरती किरकोळ वाढ जाणवणार नाही.– विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महावितरण.

देशाच्या इतर भागांच्या तुलनेत महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर सर्वाधिक असल्याने उद्योग आधीच शेजारच्या राज्यांत स्थलांतरित होत आहेत. त्यात वीज विक्री करासह इतर मार्गांनी पुन्हा वीजदर वाढल्यास आणखी उद्योग राज्याबाहेर जातील आणि बेरोजगारी वाढेल. त्यामुळे शासनाने संभाव्य धोके टाळण्यासाठी औद्योगिक वीजदर वाढू नये याची काळजी घ्यावी.– महेंद्र जिचकार, वीज तज्ज्ञ, नागपूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button