
गुहागर तालुक्यातील चिखली येथे दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
गुहागर तालुक्यातील चिखली परिसरात आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ओम संतोष शीतप (वय २२, रा. पवारसाखरी) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून, ऋतिक रमेश भुवड (वय २५) हा गंभीर जखमी झाला आहे. ओम शीतप हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि त्याला तीन बहिणी आहेत. त्याच्या निधनामुळे शीतप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पवारसाखरी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम आणि ऋतिक हे दोघे तरुण आपल्या सुझुकी एक्सेस दुचाकीने (क्र. एमएच-०८-बीएच ८८३०) तळीकडून चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने जात होते. यावेळी चिखली येथील स्वामी समर्थ मठाजवळ प्रवाशांना उतरवून वळण घेणाऱ्या टाटा मॅजिक आयरीश गाडीला (क्र. एमएच-१२-एचव्ही- ५१९५) त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला होता, तर ऋतिक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य राबवत जखमी ऋतिकला चिखली शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.




