
“जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ठाकरे शिवसेनेचा व्यापक आराखडा
रत्नागिरीत संघटनबांधणीसोबत शेतकरी आणि मच्छीमारी प्रश्नांवरही फुंकले रणशिंग”
रत्नागिरी : जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीने केवळ संघटनात्मक हालचालींना वेग दिला नाही, तर आगामी वर्षभरासाठी पक्षाच्या व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांची ठोस रूपरेषाही स्पष्ट केली. रत्नागिरी येथील शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस उपजिल्हा प्रमुख तथा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, शिव सहकार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, रत्नागिरी विधानसभा संपर्कप्रमुख सुदर्शन तोडणकर, युवासेना सहसचिव प्रदुम्न माने, जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत, राजापूर विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे सूत्रसंचालन उपतालुकाप्रमुख विजय देसाई यांनी केले.
या बैठकीत जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त (२३ जानेवारी २०२६ ते २३ जानेवारी २०२७) राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या नियोजनाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वर्षभराचा संभाव्य आराखडा सादर केला. या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कांदिवली (पूर्व) येथील नगरसेवक सचिन पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांचे मार्गदर्शन व शिवसेना उपनेते व माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांचे सहकार्य लाभणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक तसेच मच्छीमार बांधवांना भेडसावणाऱ्या बोगस खते-किटकनाशके, हवामान बदल व वाढत्या कीड-रोगांच्या समस्यांवर उपाययोजना ठरविण्यासाठी १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, बालाजी मंगल कार्यालय, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजक म्हणून कोंकण हापूस आंबा उत्पादक उपाध्यक्ष प्रकाश (बावा) शंकर साळवी आणि उपनेते, माजी आमदार तसेच रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी शेतकरी सभेचे आयोजन केले असून असून, या सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. त्यासाठी सर्व शेतकरी व मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.
या बैठकीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
पुढीलप्रमाणे वर्षभराचा संभाव्य आराखडा सादर करण्यात आला. रक्तदान व वैद्यकीय शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा महोत्सव, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा २०-२० स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन व आंतरविद्यापीठीय वादविवाद स्पर्धा, व्याख्यानमाला, लोककला महोत्सव, भजन-कीर्तन स्पर्धा अशा विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तसेच शिवचरित्रकार नितीन बानुगडे पाटील यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन, बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे आणि ‘मार्मिक’-‘सामना’तील अग्रलेखांचे प्रदर्शन, तसेच त्यांच्या भाषणांच्या चित्रफिती एलईडी व्हॅनद्वारे दाखविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. “गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक” या अभियानाद्वारे संघटन विस्तारावर विशेष भर देण्यात येणार आहे.
संघटनात्मक मजबुतीसोबतच निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) अभियानाबाबतही बैठकीत गंभीर चर्चा झाली. मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन मतदारांची नोंदणी, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि आवश्यक दुरुस्त्या करणे यावर विशेष भर देण्यात आला.
वर्षभराच्या कार्यक्रमांचे सविस्तर वेळापत्रकही सादर करण्यात आले. मे महिन्यात ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी, जूनमध्ये वर्धापन दिनानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम, जुलैमध्ये ‘मनामनातील बाळासाहेब’ व्याख्यानमाला, ऑगस्टमध्ये ‘मार्मिक’ वर्धापन दिनानिमित्त व्यंगचित्र स्पर्धा, सप्टेंबरमध्ये बालमूर्तिकार स्पर्धा, ऑक्टोबरमध्ये स्वच्छता अभियान, नोव्हेंबरमध्ये चित्रकला स्पर्धा, डिसेंबरमध्ये मेळावे आणि जानेवारी २०२७ मध्ये जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा अशा कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
या बैठकीत संघटनात्मक उभारणीसाठी “फिनिक्सप्रमाणे राखेतून झेप” घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संतोष थेराडे यांनी कार्यकर्त्यांना “मरगळ झटकून पुन्हा जोमाने कामाला लागा” असे आवाहन करत संघटनात्मक बांधणीवर भर दिला.
याच बैठकीत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेते सचिव तथा माजी खासदार श्री. विनायकजी राऊत यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी येथील विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात आठवड्यातून ठराविक दिवशी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती निश्चित करण्यात आली. सोमवारी सौ. नेहा माने, बुधवारी दत्ताजी कदम, गुरुवारी संतोष थेराडे आणि शुक्रवारी प्रसाद सावंत हे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीत नव्याने नियुक्त झालेले लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, सौ. विशाखा कुवळेकर, राजापूर उपनगराध्यक्ष विनय गुरव, रत्नागिरी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेविका सौ. फौजीया मुजावर, नगरसेवक अमित विलणकर, चिपळूण उपशहरप्रमुख मनोज पांचाळ आणि चिपळूण तालुका प्रसिद्धीप्रमुख सचिन चोरगे यांच्या विशेष कार्याची दखल घेवून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
एकूणच, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीने संघटनात्मक पुनर्बांधणी, सामाजिक उपक्रमांची व्याप्ती आणि आगामी राजकीय तयारी यांचा ठोस आराखडा मांडत कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचे स्पष्ट संकेत दिले.
या बैठकीस राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे, नवनिर्वाचित रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, सचिन उर्फ भैय्या कदम, सौ. शिवानी माने, उपजिल्हा संघटिका सौ. सायली पवार, रशिदा गोदड, रत्नागिरी महिला विधानसभा क्षेत्र संघटिका सौ. अनिशा नागवेकर, तालुका महिला संघटिका सौ. ममता जोशी, सौ. पूर्वा मुळे, जिल्हा परिषद सदस्या सौ. विशाखा कुवळेकर, नगरसेवक विनय गुरव, अमित विलणकर, नगरसेविका सौ. फौजिया मुजावर, उपजिल्हा युवा अधिकारी संतोष हातणकर, तालुका अधिकारी संदेश नारगुडे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, चिपळूण तालुका प्रसिद्धी प्रमुख सचिन चोरगे व रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिव सहकार सेना, रिक्षा सेना व अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




