
रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेले रेलिंग दोन वर्षातच गंजून पडले, निकृष्ट कामामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर करण्यात आलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. किल्ल्यावरील शिवसृष्टीनजीकच्या सनसेट पॉईंट येथे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी संरक्षक रेलिंग अवघ्या दोन वर्षांतच गंजून मोडून पडल्याचे समोर आले आहे. या रेलिंगची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ते आता अक्षरशः भंगारात काढण्याच्या स्थितीत पाहोचले आहे. त्यामुळे या ठिकाणी फिरणार्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रत्नदुर्ग किल्ल्यावर वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी सनसेट पॉईंटवर पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून लोखंडी संरक्षक रेलिंग उभारण्यात आले होते. मात्र समुद्रकिनार्यावरील खार्या व दमट वातावरणाचा विचार न करता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. समुद्राच्या खार्या वार्यामुळे लोखंडाला गंज येणे स्वाभाविक असले तरी अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण रेलिंग मोडून पडणे हे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.




