
खेडमध्ये बांधकाम साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू
भरने नाका येथील सनसिटी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर दुर्घटना; उपचारादरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित
खेड : तालुक्यातील भरने नाका परिसरातील सनसिटी कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटवर पाचव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने २९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, दि. १५ सप्टेंबर रोजी घडली.
इम्रानअली हदीस मन्सुरी (वय २९, रा. संतपूर, थाना मौजागढ, ता. मन्सुरी, जि. गोपालगंज, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रानजली मन्सुरी हे भरने नाका येथील सनसिटी कन्स्ट्रक्शनच्या साईटवर सी-हिंगचे काम करीत होते. कामादरम्यान पाचव्या मजल्यावरून त्यांचा अचानक तोल गेला. त्यानंतर ते पोडियम पार्किंगच्या ब्लॉकचर फळीसमवेत खाली पडले.
या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला, डाव्या हाताला तसेच छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खेड येथील डॉ. उपेंद्र तलाठी यांच्या मधुसिद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७६/२०२६ अन्वये करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.



