अनुस्कुरा घाटात ब्रेक निकामी झाल्याने टेम्पो पलटी,नमन कार्यक्रमावरून परतणाऱ्या कलाकारांच्या वाहनाला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली


राजापूर : कोल्हापूरकडे जाणाऱ्या राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने तो घाटातील मार्गावरच पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
एमएच ०४ सीयू ०५६६ क्रमांकाच्या टेम्पोतून कलाकार मंडळी कोल्हापूर व पन्हाळा येथे नमन कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम आटोपून ही मंडळी अनुस्कुरा घाटमार्गे परतत असताना घाटात टेम्पोचे अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो मार्गावरच पलटी झाला. या अपघातात टेम्पोचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने सर्व कलाकार सुरक्षित राहिले.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण पोलीस दूरक्षेत्र तसेच अनुस्कुरा चौकीवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनामुळे घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली.
दरम्यान, अनुस्कुरा घाटातील वारंवार होणारे अपघात आणि अवजड वाहनांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी घाट परिसरात क्रेन उपलब्ध करून देण्यात आली होती. या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टेम्पो मार्गावरून बाजूला करण्यात आला. त्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button