
नारायण राणे यांच्या हृदयात नेहमी कोकण राहिला आहे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशपांडे यांनी कोकणी माणूस काटेरी फणसासारखा असतो, असे जे म्हटले आहे ते खा. नारायण राणे यांच्याकडे पाहूनच म्हटले असावे. देशाचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व केलेल्या राणे यांच्या हृदयात नेहमी कोकण राहिला आहे.कोकणातील हजारो माणसांचे जीवन त्यांनी बदलून टाकले आहे. हिंदुत्व आणि मराठी बाणा त्यांनी कधीही सोडला नाही, असे गौरवद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली येथील कार्यक्रमात बोलताना काढले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खा. नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवारी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्रीगण व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनीच खा. नारायण राणे यांचे अभीष्टचिंतन करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
यावेळी खा. सुनील तटकरे, जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर, भाजपचे नेते प्रमोद जठार, अतुल काळसेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




