
राज्यातील बांधकाम क्षेत्र आणि घरखरेदीदारांना मोठा दिलासा , २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर (वार्षिक बाजारमूल्य) दर कायम
राज्यातील बांधकाम क्षेत्र आणि घरखरेदीदारांना मोठा दिलासा देत सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर (वार्षिक बाजारमूल्य) दर वाढवू नयेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यामुळे मालमत्ता व्यवहारांवरील अतिरिक्त आर्थिक भार टळणार असून बाजारात स्थैर्य राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेडी रेकनर दर ‘जैसे थे’
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारे रेडी रेकनर दर मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हानिहाय दरवाढीचे प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक विभागाकडे आले होते. राज्यात सरासरी ५ ते ८ टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला.
बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा
दस्त लेखनिक, विकासक आणि संबंधित संघटनांच्या सूचनांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्राला चालना मिळावी आणि मालमत्तेचे व्यवहार वाढावेत, यासाठी दर स्थिर ठेवणे गरजेचे असल्याचे सरकारचे मत आहे.




