
म्हागायच्या नावान करू नको शिमगो,चेडवा, बोट इली बंदरारबेगिन बेगिन चल गो!
होळीच्या आदल्या दिवशी दुपारी ४०० चाकरमान्यांना घेऊन भली थोरली आगबोट विजयदुर्ग बंदरावर दाखल झाली. बोटीने नांगर टाकण्याआधीच सोशल मीडियाच्या किनाऱ्यावरून काहींनी “बोटीचो प्रवास म्हाग हा” असा शिमगा करायला सुरुवात केली. अर्थात हा शिमगा तसा अर्धसत्य आहे. ही बोट म्हणजे कोकणच्या पर्यटन विकासाचे नवे दार आहे आणि ते दार बंद होता कामा नये. ते समजावून सांगण्यासाठीच हा लेखन प्रपंच!
तब्बल ४४ वर्षानंतर मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरील M2M या कंपनीच्या रो पॅक्स बोटीने तीन वेळा भोंगा वाजवला आणि कोकणातील जलप्रवासी वाहतुकीचे नवे पर्व सुरू झाले. बंदरे व मत्स्य खात्याचे मंत्री, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या नव्या पर्वाचा शानदार शुभारंभ झाला. ढोल ताशांचा गजर आणि टाळ्यांचा कडकडाट. धक्क्यावर जणू दिवाळीच झाली.
समुद्राचे पाणी कापत ही बोट विजयदुर्गच्या दिशेने रवाना झाली आणि अनेकांनी भूतकाळातील आगबोटीच्या आठवणी जाग्या केल्या. म्हणजे बोटीतील घरंगळत जाणाऱ्या फणसापासून ते तेव्हाच्या तिकीट दरापर्यंत, सर्वच आठवणींची पाने अशी उलगडत होती. वरच्या डेकवर थेट गोव्याला जाणारे आणि खालच्या डेकवर जणू बंदिस्त असलेले कोकणी, याचेही चित्र आता आलिशान वातानुकूलित बोटीतल्या आरामदायी खुर्चीवर बसून रेखाटले जात होते….
असा आठवणींचा पट मांडला जात असताना रेल्वे कोकणात आल्यानंतरचे काही प्रसंग समुद्राचा तळ फोडून वर येत होते…
प्रसंग पहिला!
दादर सावंतवाडी पसेंजर ट्रेनने चाकरमानी कणकवली स्थानकावर उतरला. बॅगा सांभाळत तो बाहेर येताच रिक्षावाल्यांनी त्याला गराडा घातला.
” नरडव्यात जाऊचा आसा. किती घेशीत?”, चाकरमान्याने एकाला विचारले.
“साडे चारशे रुपये होतीत.”, रिक्षावाल्याने दरपत्रक जाहीर केले.
यावर चाकरमानी म्हणाला,” अरे, मुंबयसून ६९ रुपयांचा तिकीट काढून इलय आणि हयना गावाक जाऊक तू साडे चारशे सांगतस?”
अखेर घासाघीस होऊन चारशेवर मांडवली झाली आणि चाकरमानी नरडव्याच्या दिशेने फिर्रकन रवाना झाला. गावच्या सीमेवर पोहचताना त्याच्या मनातील स्वस्त ट्रेन आणि महाग रिक्षा हा संघर्ष कधीच संपला होता.
प्रसंग दुसरा!
खास करून गणेशोत्सवातील हा प्रसंग आहे. रात्रभर रांगेत जागूनही कोकण रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने घरमठी गाठण्यासाठी मग काही पर्याय निवडले जातात. एक/ माणसी दोन हजार देऊन खाजगी बसने जाणे. दोन/ जनरल डब्यातील गर्दीत स्वतःला लिंपून घेणे. तीन/ पंधरा वीस हजार खर्च करून खाजगी कार घेऊन जाणे. चार/ टॅक्सीने विमानतळ गाठणे, आठ दहा हजाराचे विमान तिकीट काढून गोव्यातून तीन चार हजार टॅक्सीवालाला देणे.
हे सारे पर्याय तसे महागच असतात, पण घरात पाऊल टाकण्यापूर्वीच ते विसरले जातात.
या महागाईच्या दिवसात असे अनेक प्रसंग घडत असतात. मात्र ते वर्षानुवर्षे सवयीचे होत जातात. ना त्याची उघड चर्चा होते, ना त्यावर टीका. मग आताच सुरू झालेली बोटसेवा महाग असल्याची “बोंब” का मारली जाते? कारण एकच…मुळात ही बोट सेवा नक्की कुणासाठी आहे, याचे आकलनच आपल्याला झालेले नाही.
भाऊच्या धक्क्यावरून निघालेली ही बोट विजयदुर्ग येथे जाते. या प्रवासाचे दर ३०००, ५ हजार, ७ हजार आणि ९ हजार असे आलिशान श्रेणीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. हे दर महाग आहेत अशी बोंब सावंतवाडी किंवा कणकवली येथील माणसाने ठोकण्यात काही अर्थ आहे का? सावंतवाडी,दोडामार्ग, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, वैभववाडी येथील माणसांनी या बोटीच्या तिकीट दराबद्दल तक्रार करूच नये. कारण ही बोट प्रवासी वाहतूक करणारी असली, तरी ते प्रवासी “पर्यटक” असतील हा या आलिशान बोटीचा हेतू आहे. मुंबईकर चाकरमान्यांना गाव/घर गाठण्यासाठी कोकण रेल्वे, गोवा महामार्ग असे पर्याय उपलब्ध आहेत. हा फरक एकदा समजून घेतला की मग आपसुकच हा टीकेचा सूर मावळू लागेल. अर्थात कोकणची एक खासियत आहे. येथे कुठलाही प्रकल्प येण्या आधीच संघर्ष समिती स्थापन होते, असे चेष्टेने म्हटले जाते. सुरू झालेली बोट सेवा मात्र त्याला अपवाद ठरावी, अशीच त्या रवळनाथाचरणी प्रार्थना!
पर्यटकांचे देशी आणि श्रीमंत देशी/परदेशी असे दोन प्रकार लक्षात घेतले तर बोटीच्या खालच्या डेकवरील ३ व पाच हजाराच्या तिकिटाचे आणि वरच्या डेकवरील ७ व नऊ हजाराच्या तिकिटाचे दर योग्य वाटू लागतात. विजयदुर्ग आणि देवगड हे दोन भाग तसे पर्यटनदृष्ट्या दुर्लक्षितच मानले जात होते. मात्र जलप्रवासाच्या नव्या पर्वामुळे हे दोन्ही भाग आता अधिक ठळक आणि सक्षमपणे पर्यटन नकाशावर येणार आहेत.
या बोटीने येणारा पर्यटक विजयदुर्ग, देवगड, कुणकेश्वर आचरा मार्गे मालवण आणि नंतर वेंगुर्ले, सावंतवाडी मार्गे गोवा जाऊ शकतो. पर्यटनाचा हा नकाशा तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ही बोट शेकडो पर्यटकांना विजयदुर्ग बंदरावर आणून सोडेल…डंपरमधून भसाभसा माती ओतावी तशी! खरे तर ज्यांना या बोटीचे तिकीट महाग वाटते त्यांनी आधी डोक्यातून “गावी जाण्याचा” एक मार्ग हे गणित काढून टाकावे. पर्यटनाच्या चष्म्यातून याकडे पाहावे. विजयदुर्ग बंदरात दाखल होताना उघडणारा बोटीचा दरवाजा हा सिंधुदुर्गच नव्हे, तर अवघ्या कोकणच्या विकासाचा उघडणारा दरवाजा आहे. सुरुवात विजयदुर्गपासून झाली आहे. तो आता बंद होता कामा नये. केवळ तिकिटांचे आणि बोटीतील खानपानाचे दर ऐकून सोशल मीडियाच्या किनाऱ्यावर उभे राहून महागाईच्या शिमग्याची बोंब मारण्यात काहीच अर्थ नाही. कोकण विकासाची “उंची” ही समुद्राच्या “खोली”त आहे, हे कोकणवासीयांनी लक्षात घेतले, तर या बोटीचे रत्नागिरी, जयगड, मालवण, वेंगुर्ले हे भविष्यातील थांबे प्रत्यक्षात येतील!
कधीकाळी कोकण बोटसेवा सुरू होती तेव्हा “चल चेडवा पडावातसून, जा आगाबोटीत जपान” हे गाणे घराघरात म्हटले जायचे. आता मात्र या गाण्यात परिस्थिती आणि काळानुरूप बदल करून
“म्हागायच्या नावान करू नको शिमगो,
चेडवा,बोट इली बंदरार,
बेगिन बेगिन चल गो!”, असे गाणे गावे लागेल… शिमग्याच्या मुहूर्तावर बोट सुरू झाली म्हणून बोंब मारायलाच हवी का? अहो, नवे गाणे म्हणा…बघा खूप बरे वाटेल!!
- नितेश राणे यांचा धडाका!
राज्य सरकारमधील धडाकेबाज मंत्री म्हणून नितेश राणे यांची ओळख आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री या नात्याने त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सुरू झालेली बोटसेवा हा त्यापैकीच एक. विजयदुर्ग ते कासार्डे तिठा (मुंबई गोवा महामार्ग) हा रस्ता चार पदरी करत असतानाच बंदरावर पर्यटक बोट दाखल होणे, हा केवळ योगायोग नाही. हा कोकण विकासाच्या नकाशावरील पहिला थांबा आहे. या नकाशावरील असे अनेक थांबे जोडले जाणार आहेत आणि मग एक दिवस हा नकाशा परिपूर्ण होईल. तो दिवस नक्कीच दूर नाही. याचे सारे श्रेय अर्थातच मंत्री नितेश राणे यांनाच! - मुंबई प्रिन्सेस!
नावाप्रमाणेच ही बोट प्रिन्सेस आहे. दोन मजली वातानुकूलित आलिशान बोट. आसन व्यवस्था चार श्रेणींमध्ये विभागलेली. पहिल्या मजल्यावर बिझनेस वर्ग तर तळमजल्यावर तीन/पाच हजारांचा लाउंज. दोन्ही मजल्यांवर खानपान सेवा एकाच दरपत्रकाची. त्यात भेदभाव नाही. वरच्या मजल्यावर आरामदायी रिकलायनिंग आसनव्यवस्था, तर तळमजल्यावर केवळ आरामदायी आसने. या बोटीची एकूण प्रवासी क्षमता आहे सहाशे! पहिल्या दिवशी किमान ४०० प्रवाशांनी विजयदुर्ग बंदरावर पाऊल टाकले. त्यात माजी मंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रमोद जठार , जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्यासह अनेक पत्रकार, व्यावसायिक, उद्योजक, यूट्युबर यांचा समावेश होता. काही बाईक रायडर्स तर होतेच, पण वीस कुटुंबे आपल्या गाड्याही घेऊन आले होते. विशेष म्हणजे, मुंबईतील विपुल शाह हा बांधकाम व्यावसायिक कुटुंबासह गाडी घेऊन व्हीआयपी लाऊंजमध्ये होता. विचारले तर म्हणाला, गाडीने सिंधुदुर्ग फिरून गोव्याला जाणार आहे! मुंबई प्रिन्सेसच्या पर्यटन फेरीसेवेचे हे पहिले यश मानावे लागेल.
|| रजनीश राणे ||
(लेखक ज्येष्ठ पत्रकार, मराठी आठव दिवस चळवळीचे संस्थापक आणि कोकण अभ्यासक आहेत)




