वालोपे येथील रेल्वे स्टेशन फाट्यासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पावणेपाच लाखांचा अमली पदार्थ जप्त; तिघे ताब्यात


चिपळूण : रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंगदरम्यान वालोपे येथील रेल्वे स्टेशन फाट्यासमोर मुंबई-गोवा महामार्गावरील सबवे येथे संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना हटकले. संशय बळावल्याने या तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा म्हणजेच २ लाख, ५३ हजार ४५० रुपयांचा गांजा तसेच दोन वाहने व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ६८ हजार ४५० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश विजय जाधव (वय ३०), शिवकुमार भास्कर ठाकरे (वय ४८) आणि शंकर विनोद पारदे (वय ३१, सर्व रा. मुकीवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये “मिशन फिनिक्स” या विशेष मोहिमे अंतर्गत अमली पदार्थांना प्रतिबंध व कठोर कारवाई करण्याच्या सूचना
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार ३ मार्च रोजी चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना तालुक्यातील वालोपे येथील रेल्वे स्टेशन फाट्यासमोर मुंबई-गोवा महामार्गावरील सबवे या ठिकाणी रिक्षा आकाश जाधव, शिवकुमार ठाकरे आणि शंकर पारदे हे आपसात बोलताना व संशयास्पद हालचाली करताना आढळून आले. पथकाला या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना जागीच दोन पंचांसमक्ष थांबवून चौकशी केली.

या पथकामार्फत तात्काळ या तिघांचीही अंगझडती घेण्यात आली. या झडतीमध्ये त्यांच्या ताब्यात १० किलो १३८ ग्रॅम वजनाचा म्हणजेच २ लाख, ५३ हजार ४५० रुपयांचा किंमतीचा काळपट हिरवट रंगाचा पाने, फुले, बोंडे, काड्या व बिया असलेला उग्रवासाचा “गांजा” सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला. तसेच त्यांच्या ताब्यातील दोन वाहने व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ६८ हजार ४५० किंकिमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आकाश जाधव, शिवकुमार ठाकरे, शंकर पारदे यांनी “गांजा” हा अंमली पदार्थ गैरकायदा विक्रीच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६०/२०२६ एन.डी.पी.एस ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह श्रे.पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार शांताराम झोरे, पोलीस हवालदार दीपराज पाटील, चालक पोलीस शिपाई प्रवीण होवाळ यांनी केली.
  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button