
भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वेगाडी हरियाणामध्ये धावली!
मुंबई : डिझेल आणि विजेविना आता हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी धावण्यास सुरुवात झाली आहे. देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेगाडीची चाचणी हरियाणातील जिंद – ललित खेरादरम्यान घेण्यात आली असून चाचणीदरम्यान ही रेल्वेगाडी ताशी ७० किमी वेगाने धावली. हायड्रोजन रेल्वेगाडीची चाचणी यशस्वीपणे पार पडली असून पुढील आठवडाभर विविध टप्प्यातील चाचणी करण्यात येणार आहे.
भारतातील पहिल्या हायड्रोजनवरील रेल्वेगाडीची सोमवारी हरियाणामध्ये सुरळीत चाचणी घेण्यात आली असून भारताने हरित रेल्वे प्रवासासाठी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आठ डब्यांची रेल्वेगाडी सकाळी ८.३० वाजता जिंद रेल्वे स्थानकावरून सुटली आणि ललित खेराच्या दिशेने निघाली. या रेल्वेगाडीने २० किमी अंतर ७० किमी प्रतितास वेगाने पार केला. त्यानंतर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी ती मार्गस्थ झाली.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ही रेल्वेगाडी पूर्णपणे हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित असून पारंपरिक डिझेल, वीज, कोळशाविना धावणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जनात मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यावरणपूरक आणि हरित ऊर्जेच्या दिशेने रेल्वेचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या चाचणीदरम्यान रेल्वेगाडीची गती, इंधन कार्यक्षमता आणि सुरक्षा यांची तपासणी करण्यात आली.
हायड्रोजनवरील रेल्वेगाडी जिंद रेल्वे स्थानकातून निघाली. दोन लोको पायलट ती चालवत होते. सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवान रेल्वेगाडीत तैनात होते. आठ बोगी जोडल्यामुळे रेल्वेगाडी रेल्वेमार्गावर स्थिरपणे धावली. या रेल्वेगाडीचा वेग ताशी ७० किमीपर्यंत होता. ही रेल्वेगाडी ललित खेरा स्थानकाच्या दिशेने प्रवास करत होती. परंतु तेथे पोहोचण्यापूर्वीच ती वळवण्यात आली आणि नियोजित चाचणी अंतर पूर्ण केल्यानंतर सुरक्षितपणे जिंदला परतली. जिंदमध्ये हायड्रोजन प्लांट बांधण्यात आला आहे. त्यामुळे हे शहर देशाच्या हायड्रोजन रेल्वे प्रकल्पासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
भारतातील ही पहिली स्वदेशी बनावटीची हायड्रोजन रेल्वेगाडी आहे. ही रेल्वेगाडी जिंद – सोनीपत मार्गादरम्यान (८९ किमी) धावेल. ही रेल्वेगाडी शून्य-उत्सर्जन करणारी आणि पर्यावरणपूरक असून ती ताशी ११० किमी वेगाने धावू शकते.
सुरक्षितता आणि तांत्रिक प्रणालींचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील काही दिवसांत आणखी चाचणी धाव घेण्यात येणार आहे. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास ही सेवा प्रवाशांसाठी नियमितपणे सुरू केली जाईल. रेल्वे मंत्रालयाने देशातील काही निवडक मार्गांवर भविष्यात हायड्रोजन रेल्वेगाडी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागात स्वच्छ व आधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हायड्रोजन तंत्रज्ञानामुळे धूर आणि आवाजाचे प्रदूषण कमी होईल.




