रत्नागिरीत स्विगी-झोमॅटो डिलिव्हरी बॉईजचा अचानक संप

उबाठा युवासेना पक्षाच्या मध्यस्थीनंतर केएफसी आणि स्विगी मॅनेजर नमले

रत्नागिरी

रत्नागिरी शहरात स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉईजमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रलंबित मागण्या आणि जाचक अटींमुळे संतापलेल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी अखेर अचानक कामबंद आंदोलन पुकारले. मात्र, या गंभीर परिस्थितीची दखल घेत युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी तातडीने मध्यस्थी केली आणि संबंधित प्रशासनाला कडक भाषेत तंबी देत डिलिव्हरी बॉईजचे प्रश्न मार्गी लावले.

डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्यामागे शहरातील ‘केएफसी’ रेस्टॉरंटमधील दुरवस्था हे मुख्य कारण होते. रेस्टॉरंटच्या मुख्य गेटपासून ते डिलिव्हरी पिकअप काउंटरपर्यंतच्या फ्लोअरिंगला तब्बल ३ माणसे एकाच वेळी पडतील एवढे मोठे आणि भयानक खड्डे पडले होते. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनेक डिलिव्हरी बॉईज ऑर्डर पिकअप करताना पडून गंभीर जखमी झाले होते. वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला.
दुसरीकडे, स्विगी कंपनीच्या स्थानिक प्रबंधकाने कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्ट्यांवर गदा आणणारा एक जाचक फतवा काढला होता. आजारपण किंवा कोणतीही तातडीची आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तरीही कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेऊ नये, अशी सक्ती केली जात होती. जर कोणी सुट्टी घेतली, तर त्याच्या जागी नवीन भरती केली जाईल, अशी थेट धमकीच मॅनेजरकडून दिली जात होती. जुन्या आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या कमाईवर डल्ला मारण्याचा हा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप डिलिव्हरी बॉईजनी केला.

या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसाद सावंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट केएफसी रेस्टॉरंट गाठले आणि तिथल्या मॅनेजरशी चर्चा केली. सावंत यांच्या कडक भूमिकेनंतर मॅनेजरने तातडीने नमते घेतले. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात डिलिव्हरी बॉईजचा पिकअप पॉईंट बदलून दिला, तसेच खड्डे असलेल्या भागातील फ्लोअरिंगचे काम तात्काळ युद्धपातळीवर करून देण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर प्रसाद सावंत यांनी ‘स्विगी’च्या मॅनेजरची भेट घेऊन त्यांना आपल्या खास शैलीत कडक तंबी दिली. कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला. युवासेनेच्या या आक्रमक पवित्र्यापुढे स्विगीच्या मॅनेजरलाही झुकावे लागले. कोणत्याही डिलिव्हरी कर्मचाऱ्यावर यापुढे अन्याय होणार नाही आणि सुट्टीच्या कारणावरून कोणालाही काढले जाणार नाही, अशी हमी मॅनेजरने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button