
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, ठाकरे गटाचे गंभीर आरोप; सुप्रीम कोर्टाचे मोठे निर्देश
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत गुरुवारी दुपारी सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.चिन्ह हे पक्षासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे त्यांनी यावेळी चिन्हावर दावा केला. त्यासोबतच सुनील प्रभू पक्षाचे प्रतोद असताना नवा प्रतोद का नेमण्यात आला, अशी विचारणाही केली.त्यासोबतच निवडणूक आयोगाने अनेक बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दिलेली घटना निवडणूक आयोगाने उघडून बघितली देखील नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी यावेळी केला. यावेळी सिब्बल यांनी कोर्टासमोर सर्व घटनाक्रम मांडला. त्यानंतर या युक्तिवादावर टिपण्णी करताना कोर्टाने सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे आदेश दिले आहेत.त्यासोबतच आता सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत मंगळवारी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सुनावणीनंतर कोर्टावर आमचा विश्वास आहे, असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.




