
मोबाईल अपडेटच्या नावाखाली रत्नागिरीतील मेडिकल प्रतिनिधीची २.५४ लाखांची ऑनलाइन फसवणूक
रत्नागिरी शहरात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून मोबाईल अपडेटच्या बहाण्याने एका मेडिकल प्रतिनिधीची तब्बल २ लाख ५४ हजार २०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नाचणे रोडवरील अभ्युदयनगर येथे राहणारे नारायण दिनेश घोलप (वय ३४) हे २९ जुलै रोजी सकाळी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर सिस्टीम अपडेट सुरू असल्याचा संदेश दिसला. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलमध्ये ‘गूगल आयपीटीव्ही’ नावाचे अज्ञात अॅप आपोआप इन्स्टॉल झाल्याचे निदर्शनास आले.
या अॅपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी मोबाईलचा ताबा मिळवून ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पाच व्यवहारांद्वारे सुमारे अडीच लाख रुपये आणि बचत खात्यातून यूपीआयद्वारे ४ हजार २०० रुपये असे एकूण २ लाख ५४ हजार २०० रुपये परस्पर काढून घेतले.
बँक खात्यातून रक्कम वळती झाल्याचे लक्षात येताच घोलप यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी मोबाईलवर येणाऱ्या संशयास्पद अपडेट, लिंक किंवा अज्ञात अॅप्सपासून सावध राहावे, अधिकृत प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरशिवाय अन्यत्रून अॅप डाउनलोड करू नयेत, तसेच फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईनवर किंवा cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे




