
भविष्यातील पाणीटंचाईवर उपाय योजनांसाठी रत्नागिरीत “पाणी परिषद”
परिषदेत जलसंधारण, पाणी नियोजनावर भर
_________________________________
रत्नागिरी : भविष्यातील पाणीटंचाईची संभाव्य समस्या लक्षात घेऊन उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि प्रभावी पाणी नियोजन याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘रत्नागिरी जिल्हा शाश्वत पाणी परिषद’ उत्साहात झाली.
या परिषदेला आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती होती.
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मृद जलसंधार विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुले, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, दादा दळी आदी उपस्थित होते. संजय वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले तर नंदू तांबे यांनी प्रास्ताविक केले.
आमदार प्रमोद जठार यांनी परिषदेला उपस्थित राहून जलप्रश्नाशी संबंधित विविध विषयांची माहिती घेतली. प्रशासन, जलक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, जलप्रेमी, जलदूत, जलसेवक आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास जलसंधारणाच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देता येईल, असा सूर परिषदेत व्यक्त करण्यात आला.
या पाणी परिषदेतील सर्व मुद्द्यांवर आधारित आराखडा बनवून तो पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.
डॉ. उमेश मुंडले यांनी सांगितले की, गावागावांतील सांडपाणी ओढे आणि नाल्यांमध्ये सोडल्यामुळे पिण्याच्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. यावर उपाय म्हणून रत्नागिरी शहरातील फणशी येथे २०१९ ‘फ्लोटिंग रिडबेड सिस्टीम’च्या माध्यमातून बॅक्टेरियल कल्चर आणि वनस्पतींचा वापर करून सांडपाण्यावर यशस्वी प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु असे प्रकल्प नंतर व्हायला हवे होते. रोजच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा विचार मांडला जातो. यासाठी इस्रायलचे उदाहरण दिले जाते. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे खूप खर्चिक आहे, त्यामुळे या दृष्टीने विचार करण्याऐवजी, टप्प्याटप्प्याने पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढवण्याचा विचार करावा अशी सूचना डॉ. मुंडले यांनी केली.
दापोलीतील जलतज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे म्हणाले की, अतिथींना पूर्ण ग्लासाऐवजी अर्धा ग्लास पाणी देणे आणि हॉटेल किंवा घरात पिण्याचे पाणी सिंकमध्ये ओतून न देता काटकसरीने वापरण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. आगामी उन्हाळ्यात पर्यटन व दैनंदिन जीवन सुरळीत ठेवायचे असेल तर महाविद्यालयीन युवकांनी पुढे येऊन ‘जलदूत’ व ‘जलयोद्धे’ म्हणून काम करावे.” राज्यातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला तत्काळ बंदी घालावी, तसेच बहुमजली इमारतींमधील सांडपाणी आणि ‘एसी’तून वाया जाणारे पाणी साठवून त्याचा पुनर्वापर करावा. प्रत्येक बहुमजली इमारतीत फ्लश टँकचे व सांडपाणी संकलित करून, त्यावर प्रक्रिया करून स्वतंत्र पाईपलाईनद्वारे टेरेसवरील टाकीत साठवून त्याचा वापर करावा. एका वेळेस फ्लशसाठी ५ लिटर पाणी लागते. एका रात्रीत एका ‘एसी’तून ५ ते ८ लिटर पाणी बाहेर पडते. ते साठवून झाडांना वापरावे.
या वेळी जलसंधारणाची कामे, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पातळी वाढविणे, जलस्रोतांचे संवर्धन, पाणीगळती रोखणे तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर यासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील पारंपरिक जलस्रोतांचे जतन करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे नियोजन करण्यावरही भर देण्यात आला.
पाणी परिषदेत जलदुतांचा झाला सन्मान
याप्रसंगी जलसेवा गौरव पुरस्कारगोगटे-जोगळेकर महाविद्यालय एनएसएस विभाग, अनसूया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सौ. नीलम पालव, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, राहुल तिवरेकर, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ढेकणे, देवरुख येथील चैत्राली धस, गुहागरचे आशुतोष जोशी, दापोलीचे डॉ. प्रशांत परांजपे, चिपळुणचे शाहनवाज शहा, मजगाव येथील फैय्याज मुकादम, डॉ. उमेश मुंडले, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, नगरपालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
हॉटेलमध्ये पाणी बचत
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी सांगितले की, हॉटेल असोसिएशनच्या बैठकीत आता जे पाणी आहे, ते काळजीपूर्वक वापरा, अशा सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना पाऊण ग्लास पाणी देतो. ज्यांच्याकडे टब बाथ आहे, त्याचा वापर बंद करा, हे शौक नको. एसीतून जाणारे पाणी झाडांना घालतो. जास्तीत जास्त पाणी बचत करण्याकडे सर्व हॉटेल मालकांचा कल आहे. दुष्काळी कोकण हे प्रथमच होत आहे.
डॉ. चंद्रशेखर निमकर म्हणाले की, निवेंडी येथील माझ्या घरी सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. हे सर्वांना शक्य आहे. प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून आता पुढील सात महिने पाणी वाचवूया आणि पुढील पावसाळ्यात पाणी अडवूया. त्याद्वारे भूजल पातळी वाढेल आणि पाण्याचा ताळेबंद राखता येईल. परंतु यासाठी शासन व लोकांच्या सहभाग आवश्यक आहे.



