रत्नागिरी जिल्ह्यातील २९ दिव्यांगांना NeoMotion ई-वाहनांचे वितरण; Hyundai Mobis च्या CSR उपक्रमातून Mobis India Foundation मार्फत स्वावलंबनाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

रत्नागिरी, दि. ३० जुलै :
Hyundai Mobis यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत Mobis India Foundation मार्फत, NeoMotion यांच्या सहयोगाने तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), रत्नागिरी यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील २९ दिव्यांग लाभार्थ्यांना अत्याधुनिक NeoMotion ई-वाहनांचे तसेच त्यांच्या गतिशीलता आणि उपजीविकेला अधिक बळ देण्यासाठी अतिरिक्त बॅटरीचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमाचा लाभ लांजा, राजापूर आणि दापोली तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना झाला. ई-वाहनांमुळे लाभार्थ्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार असून रोजगार, शिक्षण, स्वयंरोजगार, व्यवसाय आणि सामाजिक सहभागासाठी त्यांना मोठा आधार मिळणार आहे. अतिरिक्त बॅटरीमुळे अधिक अंतराचा प्रवास शक्य होऊन त्यांच्या उपजीविकेला आणखी चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमास श्रीमती वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत NeoMotion ई-वाहनांचा प्रभावी वापर करून स्वावलंबी जीवन जगण्याचे, रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचे आणि आत्मविश्वासाने समाजात पुढे जाण्याचे मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद भविष्यातही सकारात्मक सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास Mobis India Foundation च्या CSR टीमच्या सदस्या श्रीमती रोशिना यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी लाभार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, Hyundai Mobis यांच्या CSR उपक्रमांतर्गत Mobis India Foundation देशभरातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतातील ६ राज्यांमध्ये एकूण ६०० NeoMotion ई-वाहनांचे वितरण करण्यात येत असून, त्यापैकी महाराष्ट्रासाठी ६० वाहनांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये २० वाहनांचे वितरण नागपूरमध्ये, २९ वाहनांचे वितरण रत्नागिरीमध्ये करण्यात आले असून उर्वरित वाहनांचे वितरण मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. त्यांनी लाभार्थ्यांना या ई-वाहनांचा प्रभावी वापर करून शिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि स्वावलंबनाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास श्री. विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, श्रीमती सुनिता शिरभाते, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, श्री. दीपक आंबवले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग तसेच श्री. कृणाल देसाई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी यांची उपस्थिती लाभली.

तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, रत्नागिरी येथील श्रीमती साक्षी चाळके, श्री. कल्पेश साखरकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये सामाजिक प्रतिनिधी श्री. समीर नाकाडे आणि श्री. सादिक नाकाडे यांनी विशेष योगदान दिले. लाभार्थ्यांची ओळख (Beneficiary Identification), पात्र लाभार्थ्यांपर्यंत उपक्रमाची माहिती पोहोचविणे, लाभार्थ्यांची निवड तसेच कार्यक्रमाच्या नियोजन आणि यशस्वी अंमलबजावणीमध्ये त्यांनी सक्रिय सहकार्य केले.

NeoMotion ही आयआयटी मद्रासच्या तंत्रज्ञानावर आधारित अभिनव प्रणाली असून, साध्या मॅन्युअल व्हीलचेअरचे काही सेकंदांत अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोबिलिटी वाहनात रूपांतर करते. या तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तींना अधिक स्वतंत्र, आत्मविश्वासपूर्ण आणि सन्मानाने जीवन जगणे शक्य होत असून, रोजगार, शिक्षण, स्वयंरोजगार आणि सामाजिक सहभागासाठी नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

Hyundai Mobis च्या CSR उपक्रमातून Mobis India Foundation मार्फत राबविण्यात आलेला हा उपक्रम उद्योग, सामाजिक संस्था आणि शासन यांच्यातील प्रभावी भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला असून, दिव्यांग व्यक्तींच्या गतिशीलतेबरोबरच त्यांच्या उपजीविका, स्वावलंबन आणि सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button